नवी दिल्ली : Coronavirus कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात सध्या विविध मार्गांनी या विषाणूवर मात करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. एकिकडे मुंबईत म्हणजेच देशाच्या आर्खित राजधानीत कोरोना झपाट्याने फोफावत असतानाच दुसरीकडे देशातील चित्र मात्र काहीसं दिलासा देणारं ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि गृहमंत्रालयाच्या प्रतिनिधींकडून घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती सांगण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या लव्ह अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता, २३,०७७ वर पोहोचला आहे. 


मागील चोवीस तासांत जवळपास १६८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय देशात कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांचा दर पाहिल्यास हे प्रमाण २०.५७ टक्के इतकं असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. मागील २८ दिवसांमध्ये १५ जिल्ह्यांमद्ध्ये एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 



सध्याच्या घडीला देशातील ८० जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवसांमध्ये एकही नवा कोरोनाचा रुग्ण सापडलेलला नाही. त्यामुळे देशासाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. 


 


देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, शिवाय लॉकडाऊनचे नियमही काटेकोरपणे पाळले गेल्यास याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. शिवाय आरोग्य यंत्रणांवर यांमुळे येणारा ताणही कमी होणार आहे. ज्यामुळे नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य जाणत त्या अनुशंगाने स्वयंशिस्त अंगी बाणवत या महामारीवर मात करावी असंच आवाहन सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.