नवी दिल्ली : केंद्र सरकार सामान्यांना महागाईच्या खाईत लोटण्याचे संकेत दिलेत. ऑक्टोबर महिन्यापासून सीएनजी, वीज दर महागण्याची शक्यता आहे. परदेशी बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती १४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे किरकोळ सीएनजी, वीज आणि यूरिया उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईला आमंत्रण मिळण्याचे संकेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नैसर्गिक वायूच्या घरगुती उत्पादकांना सध्या ३.६ डॉलर प्रति युनिट (एमएमबीटीयू) किंमत मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये या किमतीत १४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या किमतींचा दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. त्यानंतर ठरविण्यात येणारे नवे दर अतिरिक्त वायू उपलब्ध असलेल्या अमेरिका, रशिया आणि कॅनडा या देशांच्या केंद्रांवर प्रचलित दरांच्या सरासरीवर अवलंबून असतात. त्यामुळे यावेळी वायूचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे, अशी सूत्रांनी माहिती आहे.


नव्या दरांची घोषणा येत्या २८ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. भारताला आवश्यक असलेल्या वायूपैकी ५० टक्के वायू आयात केला जातो. या वायूची किंमत घरगुती गॅसच्या किंमतीच्या दुप्पट असते. घरगुती गॅसचे नवे दर येत्या १ ऑक्टोबरपासून पुढील ६ महिन्यांसाठी असणार आहेत. हे नवे दर ऑक्टोबर २०१५ पासून ते मार्च, २०१६ या कालावधीतील दरांच्या तुलनेत सर्वाधिक दर असणार आहेत. नैसर्गिक वायूचे दर वाढण्याने ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मिळकतीत वाढ होणार आहे. तथापि, यात सीएनजीचाही दर वाढणार आहे. बरोबरच यामुळे यूरिया आणि वीजेच्या उत्पादन खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.