देवीचा नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का ?
दुर्गा देवीचा नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का ? आठ दिवसांचा किंवा दहा दिवसांचा का नाही ? असा प्रश्न हमखास विचारला जातो. किंवा कधीतरी तुमच्या मनातही आला असेल.
मुंबई : दुर्गा देवीचा नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का ? आठ दिवसांचा किंवा दहा दिवसांचा का नाही ? असा प्रश्न हमखास विचारला जातो. किंवा कधीतरी तुमच्या मनातही आला असेल.
तुमच्या मनातल्या या प्रश्नाला प्रसिद्ध पंचागकर्ते दा. कृ सोमण यांनी उत्तर दिले आहे.
निर्मितीशक्ती - आदिशक्ती आणि नऊ अंक यांचे एक नाते आहे. बी जमिनीमध्ये गेले की नऊ दिवसानी अंकुरते. गर्भधारणा झाल्यानंतर नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते, नवरात्र हा मातृशक्तीचा, निर्मितीशक्तीचा , आदिशक्तीचा उत्सव असतो म्हणून नवरात्र नऊ दिवसांचे असते. नऊ या ब्रह्मसंख्येचे आणि निर्मितीशक्तीचे अतूट नाते आहे. अंकांमध्ये ' नऊ ' हा सर्वात मोठा अंक आहे.
घटस्थापनेने नरात्रीची सुरूवात होते. दुर्गा देवीच्या मूर्तीचे, नवार्ण यंत्राचे आणि ओली माती मातीच्या घटात ठेवून त्यात गहू किंवा इतर धान्य पेरून त्या घटाची षोडशोपचार पूजा करायची प्रथा आहे. यंदा आश्विन शुक्ल प्रतिपदा सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे. तो पर्यंत घटस्थापना करावयाची आहे. समजा एखाद्याला या वेळेत शक्य झाले नाही तर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत घटस्थापना करण्यास हरकत नाही. देवीच्या शेजारी दीप अखंड तेवत ठेवावा. तसेच देवीपुढे दररोज वाढत जाणार्या लांबीची फुलांची माळ बांधावी. नंतर आरती करून सप्तशतीचा पाठ वाचावा.
नवरात्राच्या नऊ दिवसात उपवास करतात. उपवास केल्याने शरीरातील मांद्य निघून जाते. शरीर हलके बनते. त्यामुळे पूजा-उपासना करताना मनाची एकाग्रता साधणे सुलभ होते. आत्मशद्धीसाठी उपवास केला जातो. चित्त शुद्ध होते. मनात वाईट विचार येत नाहीत. काही उपासक नवरात्रात हलका आहार घेऊन उपवास करतात. तर काही भाविक केवळ फलाहारच करतात. तर काही एक वेळ जेवण घेतात . काही लोक फक्त पाणी पिऊन उपवास करतात. तर काही भक्त निर्जळी म्हणजे पाणीही न पिता उपवास करतात. मात्र असे कडक उपवास करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
तुम्ही एक गोष्ट नीट समजून घ्या की उपवास हे अंतिम साध्य नाही. उपवास हे एक साधन आहे. शरीरास अपायकारक होईल असा उपवास करणे योग्य होणार नाही. या नऊ दिवसात काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्र रिपूंवर नियंत्रण ठेवावे. त्यामुळे तुमचे मनोधैर्य , आत्मविश्वास वाढत असतो. कारण कोणत्याही देवतेची पूजा करण्यामागे आपला एकच हेतू असावा तो हा की आपल्यात चांगला बदल व्हावयास हवा.
आपण व्यसनी, भ्रष्टाचारी, आळशी, अज्ञानी, अंधश्रद्धेने ग्रासलेले असू तर पूजा केल्याने आपण निर्व्यसनी, नीतीमान, उद्योगी, ज्ञानी, वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करणारे व्हावयास हवे आहे. पूजा केल्याने आपण निर्भय व्हावयास हवे आहे. आपल्यात जर असा चांगला बदल जो आपल्याच हातात आहे तो जर झाला नाही तर पूजा, उपासना करून काहीही साध्य होणार नाही. हे कलियुग आहे. इथे केवळ देवीची पूजा -उपासना करून काहीही साध्य होणार नाही. आपल्यात चांगला बदल करणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. तसे नसते तर रोज मंदिरात देवीची पूजा करणारा पुजारी श्रीमंत झाला असता. त्याला जीवनात कोणताही प्रश्न राहिला नसता. या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत.