चंदीगड : माजी क्रिकेटपटू, भाजपा नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर या निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. कौर यांनी पंजाबमधील चंदीगढमधून काँग्रेसकडे लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितले आहे. त्यांचा तिकीटासाठीचा अर्ज चंदीगड काँग्रेसचे प्रमुख प्रदीप छाबडा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अर्ज दिल्यानंतर नवज्योत कौर यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितले की, काँग्रेसकडून चंदीगडमध्ये कोणतीही महिला प्रतिनिधित्व करत नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मी शहराचे प्रतिनिधीत्व केले पाहिजे'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौर यांनी काँग्रेस अध्यक्ष प्रदीप छाबडा यांना लिहिलेल्या अर्जात 'मी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चंदीगढमधील मतदारसंघातून उभे राहण्यासाठी आपला अर्ज देत आहे. माझ्या कामाचा सर्व तपशील सोबत जोडण्यात आला आहे. मला अपेक्षा आहे की, माझ्या विनंतीवर विचार केला जाईल. मला या शहरातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली जाईल' असे लिहिले आहे. शहरातील तरूणांना नोकरी मिळवून देणे हा माझा अजेंडा असणार असल्याचेही त्यांनी म्हटले.  


काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री पवन कुमार बंसल आणि मनीष तिवारी चंदीगडमधील प्रमुख दावेदार मानले जात आहेत तर भाजपा खासदार किरण खेर लोकसभामध्ये चंदीगडचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु नवज्योत कौर यांनी किरण खेर शहरात काही खास काम करू शकल्या नसल्याचे सागंत त्या जनतेची सेवा करण्यात असमर्थ ठरल्याचे त्यांनी सांगितले. 


नवज्योत कौर यांनी लोकसभा निवडणूकीसाठी केलेल्या अर्जामुळे चंदीगडमधील काँग्रेसच्या तिकीटासाठी अर्जदारांची संख्या तीनवर पोहचली आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून नवज्योत कौर यांना तिकीट दिले जाणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कौर यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने आता पंजाबमधील राजकीय वर्तुळात कोणत्या नव्या घडामोडी घडणार हे पाहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.