`एक देश एक निवडणूक संकल्पना चांगली पण...`- पवार
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे.
नवी दिल्ली : एक राष्ट्र एक निवडणूक संकल्पनेवर विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच एक समिती स्थापन करणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. आज सर्वपक्षीय बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली. ठराविक कालावधीत या समितीला सूचना करायच्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे. एक देश एक निवडणूक संकल्पना चांगली आहे पण ही एक राजकीय समस्या आहे. अंमलबजावणी कशी करणार ? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे. एक देश एक निवडणूक संकल्पनेसाठी घटनेत दुरूस्ती करावी लागणार आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर चर्चा करावी लागेल असे पवारांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी यासंदर्भात एक पत्र लिहिले असून त्यात हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
बहुतांश पक्षांनी या संकल्पनेला पाठिंबा दिल्याचंही राजनाथ सिंह यांनी आज सांगितले. डाव्या पक्षांनी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित केल्या असल्या तरी त्यांचा विरोध नाही, असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, भाकपाचे डी. राजा, एमआयएमचे असादुद्दीन ओवेसी, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आदी नेते बैठकीला उपस्थित होते. नवीन पटनायक संकल्पनेला पाठिंबा दिला असला तरी घटनेच्या प्रस्तावनेमध्ये अहिंसा आणि शांतता हे शब्द घालण्याची त्यांची मागणी आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडून कुणीही हजर राहणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.