नवी दिल्ली - जाहीर सभेमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय महिला आयोगाने गुरुवारी नोटीस बजावली. राहुल गांधी यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे अश्लील स्वरुपाचे होते, असे महिला आयोगाने म्हटले आहे. जयपूरमधील जाहीर सभेमध्ये बुधवारी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना निर्मला सीतारामन यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राफेल प्रकरणात स्वतःला उत्तर देता आले नाही म्हणून मोदी यांनी एका महिलेला पुढे केले. स्वतःचे रक्षण करण्यास एका महिलेला सांगितले, अशा स्वरुपाचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या, राहुल गांधी यांनी बुधवारी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यांचे वक्तव्य निंदनीय, अश्लील आणि आक्षेपार्ह होते. त्यामुळेच त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. महिलांबद्दल असे वक्तव्य करून त्यांना नक्की काय सांगायचे होते, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे.



भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात संरक्षण मंत्रीपद भूषविणाऱ्या महिलेला कमकुवत समजणे यापेक्षा मोठे विडंबन कसलेही नसेल, असे ट्विटही रेखा शर्मा यांनी केले. दरम्यान राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून एक ट्विटही केले आहे. त्यामध्ये त्यांनी मोदी यांना पुन्हा एकदा प्रश्न विचारला आहे. मोदींचा पूर्ण आदर राखून मी एक प्रश्न विचारतो. आपल्या संस्कृतीमध्ये महिलांविषयीचा आदर घरापासून सुरू होतो. आता तरी पुरुषासारखे माझ्या प्रश्नाला उत्तर द्या. मूळ राफेल करार बाजूला ठेवत तुम्ही नवे निर्णय घेतले, त्यावेळी हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयाने त्यावर आक्षेप घेतला होता का? हो की नाही, असा प्रश्न राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला. 


नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आग्रामधील सभेत राहुल गांधींचे वक्तव्य म्हणजे देशातील महिलांचा अपमान असल्याचे म्हटले होते. लोकसभेत विरोधकांनी केलेल्या आरोपांना निर्मला सीतारामन यांनी सडेतोड उत्तर दिल्याचेही त्यांनी सांगितले.