रोहित तिवारी हत्याप्रकरणाचा उलगडा; पत्नीकडून हत्येची कबुली
दोघांमध्ये झटापट झाली आणि अपूर्वाने रोहितचा गळा दाबला.
नवी दिल्ली: दिवंगत राजकीय नेते एन.डी. तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी याच्या हत्याप्रकरणाचा उलगडा करण्यात दिल्ली पोलिसांना यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी रोहितची पत्नी अपूर्वा हिला ताब्यात घेतले. यानंतर केलेल्या चौकशीत अपूर्वा हिने रोहितची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात वकील असलेल्या अपूर्वाने रोहितची हत्या करताना कोणताही पूर्वनियोजित कट आखला नव्हता. मात्र, या दोघांच्या नात्यामध्ये बराच कडवटपणा निर्माण झाला होता. लवकरच ते घटस्फोटही घेणार होते. रोहितच्या हत्येच्या दिवशीही दोघांमध्ये भांडण झाले होते. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली आणि अपूर्वाने रोहितचा गळा दाबला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
१६ एप्रिल रोजी रोहित शेखर तिवारी याचा गूढरित्या मृत्यू झाला होता. रोहितच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा नव्हत्या. यानंतर शवविच्छेदन अहवालात रोहितचा तोंड दाबून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
या माहितीच्याआधारे पोलिसांनी रोहितच्या नातेवाईकांची चौकशी करायला सुरुवात केली होती. तेव्हा अपूर्वाने दिलेल्या परस्परविरोधी माहितीमुळे पोलिसांचा तिच्यावर संशय होता. १० एप्रिल रोजी रोहित तिवारी आपली आई आणि नातेवाईकांसोबत उत्तराखंड येथे मतदानासाठी गेला होता. तेथून रोहित १५ एप्रिलला आपल्या घरी परतला. या प्रवासादरम्यान रोहित पूर्णवेळ दारुच्या नशेत होता. यावेळी त्याच्यासोबत नात्यातील एक महिलाही होती. १५ एप्रिलला रात्री साधारण ११ वाजता रोहित घरी पोहोचला. यानंतर तो काहीवेळ आईशी बोलला. मात्र, दारुच्या नशेत असल्यामुळे तो लगेच स्वत:च्या खोलीत गेला. यानंतर साधारण १२.३० च्या सुमारास अपूर्वाही खोलीमध्ये गेली. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा दोघांमध्ये झटापट झाली आणि अपूर्वाने रोहितचा गळा दाबला. मात्र, अपूर्वाने आपण रोहितला १६ एप्रिलला दुपारी एक ते दोनच्या दरम्यान शेवटचे पाहिल्याचे सांगितले होते. परंतु, शवविच्छेदन अहवालात रोहितचा मृत्यू रात्रीच्या जेवणानंतर साधारण दोन तासांनी झाल्याचे नमूद केले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी अपूर्वाची सोमवारी दहा तास कसून चौकशी केली. यावेळी अपूर्वाने हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.