नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला अनेकदा धारेवर धरण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारकडून विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली. या पार्श्वभूमीवर एक लक्षवेधी माहिती समोर आली आहे. त्यानुसार गेल्या साडेचार वर्षांमध्ये एनडीए सरकारमधील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर २३९.०५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, याकडे बारकाईने पाहिल्यास खर्चाचा हा आकडा उतरता असल्याचे लक्षात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळ कामकाज विभागातील वेतन व लेखा कार्यालयाने ही माहिती दिली आहे. त्यानुसार साडेचार वर्षांत कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या परदेश वारीसाठी अनुक्रमे २२५.३०कोटी आणि १३.७५ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. सध्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट आणि ४५ राज्यमंत्री आहेत. यापैकी ११ मंत्र्यांकडे स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. 


मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यावर्षी मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर ९०.८८ कोटी रूपये खर्च झाले होते. यामध्ये मे महिन्यापर्यंत यूपीए सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या परदेश दौऱ्याचाही खर्च समाविष्ट होता. तर दुसऱ्या वर्षात हा खर्च ७५.९८ कोटींपर्यंत खाली आला. यानंतर तिसऱ्या वर्षापासून मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरील खर्चात लक्षणीय घट दिसून येते. २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये मंत्र्यांच्या परदेश वारीसाठी अनुक्रमे ३६.९९ आणि २३.८५ कोटी रुपये खर्च झाले. दुसरीकडे याच साडेचार वर्षांच्या काळात राज्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यासाठी अनुक्रमे २.४० कोटी, ४.५३ कोटी, ३.०३ कोटी आणि ३.७९ कोटी इतका खर्च झालाय. 



साडेचार वर्षात मोदींच्या ८४ परदेश वाऱ्यांवर झाला 'इतका' खर्च


काही दिवसांपूर्वीच रराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, साडेचार वर्षात पंतप्रधान मोदींच्या ८४ परदेश दौऱ्यांसाठी २०११ कोटी रुपये इतका खर्च झाल्याची माहिती दिली होती.