मराठी पाऊल पडते पुढे... महाराष्ट्राची लेक ठरली Self-Made Women
नेहा नारखेडे यांनी श्रीमंतांच्या यादीत मिळवलेल्या स्थानामुळे त्या सर्वांत तरुण स्वयंनिर्मित (Self-Made Women) भारतीय महिला उद्योजक ठरल्या आहेत.
मुंबई : तुम्हाला दंगल चित्रपटातला अमीर खानचा 'तो' डायलॉग आठवतोय का? "छोरी क्या छोरोंसे कम हे क्या?" असचं काहीसं भारतीय वंशाच्या नेहा नारखेडे यांच्या बद्दल म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या आठवड्यात जगातील श्रीमंत व्यक्तींच्या प्रसिद्ध झालेल्या आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 (IIFL Wealth Hurun India Rich List 2022) मध्ये भारतातील उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) पहिल्या क्रमांकावर आहेत, तर त्यांचे भाऊ विनोद शांतीलाल अदाणी (Vinod Shantilal Adani) सर्वांत श्रीमंत एनआरआय ठरले आहेत. पण, या यादीतील 336 व्या क्रमांकावरील नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आणि ते नाव म्हणजे नेहा नारखेडे.
नेहा नारखेडे यांनी श्रीमंतांच्या यादीत मिळवलेल्या स्थानामुळे त्या सर्वांत तरुण स्वयंनिर्मित (Self-Made Women) भारतीय महिला उद्योजक ठरल्या आहेत. नेहा नारखेडे मालमत्ता या साधारणत: 4700 कोटी रुपयांच्या मालकीन आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्टमधील या टिपिकल मराठी आडनावाच्या स्त्रीबद्दल त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
कॅलिफोर्नियात राहणाऱ्या नेहा यांचा पाच वर्षांतील स्वबळावरचा हा प्रवास उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. नेहा यांचा जन्म पुण्यात झाला असून, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून अभियांत्रीकीचं शिक्षण पुर्ण केलंए. त्यानंतर एमएसचं शिक्षण त्यांनी जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पुर्ण केलं. आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले आहे. नेहा यांनी ओरॅकल आणि त्यानंतर लिंक्डइनमध्ये काम केल्यानंतर नेहा यांनी सहकारी जुन राव आणि जय क्रेप्स यांच्यासोबत मिळून ‘अपाचे काफ्का’ (Apache Kafka) हे ओपन सोर्स प्लॅटफॉर्म सुरू केलं. या तिघांनी मिळून 2014 मध्ये ‘कॉन्फ्लुएण्ट’ (Confluent) हे स्टार्टअप सुरू केलं.