MTNL आणि BSNL बंद होणार नाही; केंद्र सरकारचा निर्वाळा
या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना उपलब्ध करून देण्यात येईल
नवी दिल्ली: सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर संचार निगम लिमिटेड (MTNL)या कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाहीत, असा निर्वाळा केंद्र सरकारकडून देण्यात आला. केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी बुधवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, MTNL आणि BSNL या कंपन्या बंद होणार नाहीत, त्यांची निर्गुंतवणूक होणार नाही किंवा त्यांचा कारभार अन्य कोणत्याही कंपनीकडे दिला जाणार नाही, असे रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. तसेच या दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने MTNL आणि BSNL च्या पुनरुज्जीवन योजनेला मंजुरी दिल्याचीही माहिती रवीशंकर प्रसाद यांनी दिली. मात्र, या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना उपलब्ध करून देण्यात येईल, असे रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयानुसार MTNL आणि BSNL या दोन्ही कंपन्यांच्या पुनर्भांडवलीकरणासाठी २९,९३७ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यापैकी १५ हजार कोटी रुपये रोख्यांच्या माध्यमातून उभारण्यात येतील. तर उर्वरित ३८ हजार कोटी कंपन्यांच्या मालमत्ता विकून उभारले जातील.
सध्याच्या घडीला BSNL मध्ये तब्बल १.६५ लाख कर्मचारी आहेत. गेल्या काही काळापासून MTNL आणि BSNL सातत्याने तोट्यात आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले होते.
या दोन्ही कंपन्यांकडे ४ जी स्पेक्ट्रमच्या लहरी नसल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत त्या मागे पडल्या होत्या. मात्र, तरीही MTNL आणि BSNL च्या ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे. परंतु, केंद्राने आता या दोन्ही कंपन्यांना ४ जी स्पेक्ट्रम उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे MTNL आणि BSNL चा व्यवसाय आणखी वाढू शकतो.