पार्टीत फटाके फुटताच घाबरलेल्या बायकोला जवळ घेतलं, पण रडणाऱ्या मुलीकडे पाहिलंही नाही; VIDEO पाहून नेटकरी संतापले
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांचं बेजबाबदार वागणं कैद झालं आहे. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Viral Video: सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध व्हावं यासाठी आजकाल प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सध्या तर रीलचा जमाना असल्याने प्रत्येकजण आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करत असतो. यानंतर त्या व्हिडीओंना गाणी लावून ते इंस्टाग्राम, फेसबुकला शेअर केले जातात. पण हे व्यसन अनेकदा आपल्या जीवावर बेतण्याची भीती असते. तसंच आपण यामुळे किती निष्काळजीपणा करत आहोत याची जाणीवही राहत नाही. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका लहान मुलीच्या पार्टीतील हा व्हिडीओ पालकांचा निष्काळजीपणा दाखवत आहे.
कंटेंट क्रिएटर परी सोनीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी परी आणि तिच्या पतीला खडेबोल सुनावत आहेत.
व्हिडीओत दिसत आहे की, पार्टीदरम्यान दांपत्य आपल्या मुलीसह कार्यक्रमात प्रवेश करतं. मुलगी यावेली सजवलेल्या प्रॅमवर बसलेली असते. यादरम्यान आजुबाजूला फटाके लावण्यात आलेले असता आणि आतीषबाजी सुरु असते. पण यावेळी एक फटाका फुटून जोडपं आणि बाळाच्या दिशेने येतो.
एक जळका तुकडा अंगावर आल्याने परी जखमी होते. यानंतर तिचा पती तात्काळ तिला जवळ घेतो. पण यादरम्यान हतबल असणाऱ्या आपल्या चिमुरडीकडे त्याचं अजिबात लक्ष जात नाही. रडणाऱ्या आपल्या मुलीला दुर्लक्षित करत तो फक्त पत्नीला फटाक्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. यानंतर कुटंबातील एक ज्येष्ठ महिला पुढे येते आणि मुलीला वाचवण्यासाठी उचलून घेते.
परीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "फक्त छोटीशी चूक झाली, पण देवाने माझ्या मुलीची रक्षा केली याबद्दल आनंदी आहे. कृपया रॉयल एंट्रीमध्ये फटाक्यांचा वापर करु नका, खासकरुन लहान मुलांच्या पार्टीत". पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संतापले असून परीने केलेल्या दाव्याशी अजिबात सहमत नाहीत.
एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत लिहिलं आहे की, "माझ्यानुसार शोऑफ, धोकादायक, बालीश आणि बेजबाबदार पालक". दुसऱ्याने म्हटलं आहे की, "एकदा एका ज्ञानी माणसाने म्हटले होते की, प्रत्येक मुलाला आई-वडिल असावेत पण सर्वच पालक मुलांसाठी पात्र नसतात".
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, परीने एका इंस्टाग्राम युजरला उत्तर देत तिच्या व्हिडिओच्या संदर्भात नकारात्मकता पसरवू नका अशी विनंती केली. तसंच लोकांनी अशा धोकादायक स्थितींपासून दूर राहावं याबद्दल माहिती देण्यासाठी हा व्हिडीओ पोस्ट केला होता असा दावा केला आहे.