पाहा कधी येणार तुमच्या हातात शंभराची नवी नोट
१०० रुपयांची नवी नोट चलनात येण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई : नोट बंदीनंतर २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटात चलनात आल्या. त्यानंतर ५० रुपये, २० रुपये आणि १० रुपयांच्या नवीन नोटा चलनात येत असल्याची चर्चा रंगली होती. याबाबत रिझर्व्ह बँकेकडून तशी तयारी करण्यात आली असून लवकरच शंभर रुपयांची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. मात्र, शंभर रुपयांची जुनी नोटही चलनात कायम असणार आहे. १०० रुपयांच्या या नव्या नोटेचा रंग हलका जांभळा ( लवेंडर) आहे. पण १०० रुपयांची नवी नोट चलनात येण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.
या नोटेमध्ये पुढील बाजूस महात्मा गांधीजींचे छायाचित्न, मागच्या बाजूला भारतीय सांस्कृतिक वारसा दर्शवणारी गुजरातच्या ऐतिहासिक राणीची विहीर दाखवण्यात आली आहे. या नोटेचा आकार जुन्या शंभर रुपयाच्या नोटेपेक्षा कमी आहे.
एटीएमचा मुद्दा
२०० रुपयांची नोट जारी करतानाही एटीएमला रिकॅलिब्रेट कराव लागलं होतं. २०० रुपयांची नोट सर्व एटीएमला रिकॅलिब्रेट करण्याच काम अद्याप पूर्णही झालं नाहीए तरही १०० रुपयांची नोट आणली गेली आहे. पण ही नोट सर्व एटीएममध्ये उपलब्ध होईपर्यंत १ वर्षाचा कालावधी जाणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
नव्या नोटांच्या आकारात रिकॅलिब्रेट होणार ATM
कोणत्याही नोटचा आकार बदलल्यानंतर एटीएमचे रिकॅलिब्रेट होणं गरजेचं असल्याचे एटीएम सर्व्हिस देणाऱ्या कंपनीने एफएसएस डायरेक्टर, सीएटीएमआय आणि प्रेसिडेंट व्ही बालासुब्रम्हण्यम यांनी सांगितले. एटीएममध्ये जुन्या नोट जारी ठेवणं आणि त्याचवेळी नव्या आकाराच्या नोटाही असण यांच गणित कसं जुळवायचं हा प्रश्न कायम असल्याचेही त्यांनी म्हटले.