जमीनदाराच्या पोराचे प्रताप; नवी कोरी बीएमडब्लू नदीत फेकली
वडिलांनी भेट दिलेली ६० लाखांची बीएमडब्लू कार आवडली नाही.
हरियाणा : वडिलांनी भेट दिलेली ६० लाखांची बीएमडब्लू कार आवडली नाही म्हणून ती नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार हरियाणात घडला आहे. ज्या मुलाने कार फेकली त्याला एक कोटी रुपयांच्या घरातली जॅग्वार कार हवी होती. या कारच्या हट्टापोटी त्याने नवी कोरी कार नदीत फेकली.
बीएमडब्लू कार विकत घेऊ असे अनेक स्वप्नाळू लोकं तुम्हाला भेटतील. पण मेहनत न करता त्याही पेक्षा मोठी स्वप्न पाहणारी श्रीमंत बापाची मुलं कमी नाहीत.
हरियाणातल्या मुकारपूरच्या जमीनदाराचा मुलगा आकाशला वडिलांनी भेट दिलेली कार आवडली नाही, म्हणून चक्क नवी कोरी ६० लाखांची बीएमडब्लू कार नदीत फेकून दिली. खरं तर या दिवट्याला वाढदिवसाला वडिलांकडून जॅग्वार कार भेट हवी होती.
वडिलांनी जग्वारऐवजी बीएमडब्लू कार घेऊन दिली. यावरही या सावकाराच्या पोराची सटकली त्याने कार नदीत बुडवली. वर त्याचा टीकटॉक व्हिडिओ बनवला. नदीत पोहणारी कार पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.
नदीत वाहून जाणारी नवी कोरी कार जेव्हा पोलिसांना दिसली तेव्हा पोलिसांनी ही कार बाहेर काढली. कार काढताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.
कारच्या मालकाचा जेव्हा शोध घेतला तेव्हा झाला प्रकार पोलिसांना समजला. पोलिसांनी या प्रकरणी सावकाराच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे.