नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरु झालाय. अमेरिका आणि भारताची दोस्ती आणखी मजबूत करण्यासाठी इवांका  भारतात आलेय.  उद्योजक परिषदेसाठी ती आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची कन्या चारमीनारच्या या शहरात उद्योजक परिषदेत भाग घेणार आहे.  


दहा हजार जवान तैनात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 इवांकाबरोबर आलेल्या अमेरिकेच्या दीडशे प्रतिनिधींसाठी दहा हजार जवान तैनात करण्यात आलेत. अर्थात इवांकाचा सुरक्षा प्लॅन अतिशय गुप्त ठेवण्यात आलाय. 


इवांकाला तीन स्तरीय सुरक्षा


इवांकासाठी हैदराबादमधली काही फाईव्हस्टार हॉटेल्स आरक्षित करण्यात आलीयत. पण त्यापैकी कुठल्या हॉटेलमध्ये इवांका राहणार, हे जाहीर करण्यात आलेलं नाही. इवांकाला तीन स्तरीय सुरक्षा असणार आहे. सगळ्यात आतलं सुरक्षेचं कडं हे यूनाइटेड स्टेट्स सीक्रेट सर्विसचं असणार आहे. तर बाहेरची दोन सुरक्षा कडी ही हैदराबाद पोलिसांची असणार आहेत.


काटेकोरपणे खबरदारी


हॉटेलच्या ज्या मजल्यावर राहणार आहे, त्या मजल्यावर, तसंच त्याच्या वर आणि खालच्या मजल्यावर कुणालाही राहण्याची परवानगी नाही. ती राहणाऱ्या हॉटेलमध्ये येणाऱ्या भाज्यांपासून सगळं सामान काटेकोरपणे तपासलं जातंय. ज्या हॉटेलमध्ये ती राहणार, त्याच्या आसपासच्या जवळपास पस्तीसशे लोकांना इशारा देण्यात आलाय. 



खबरदारीचे आदेश स्थानिकांना


तीन दिवसांत नातेवाईकांना आणि मित्रांना तुमच्या घरी बोलवू नका, असे खबरदारीचे आदेश स्थानिकांना देण्यात आलेत.  इवांका ट्रंपचं सुरक्षा कवच भेदणं कठीणच नव्हे तर अशक्य आहे. तिच्या सुरक्षेसाठी यूएस सीक्रेट सर्विसनं तीन बुलेटप्रूफ लिमोझिन्स भारतात पाठवल्यायत. 


परदेशी  फुलांची सजावट


इवांका ज्या हॉटेलमध्ये राहणार, त्या हॉटेलमध्ये बैंकॉक, सिंगापूर, इंडोनेशिया आणि  बंगळुरुहून आणलेल्या फुलांची सजावट करण्यात आलीय. तसंच देशातल्या विविध भागातल्या हॉटेल ताजमधून विविध शेफना हैदराबादमध्ये बोलावण्यात आलंय. ते इवांकासाठी स्पेशल डिश तयार करणार आहेत.  इवांकाच्या जेवणासाठी सोनं आणि चांदीची ताटं आणि चमचे मागवण्यात आलेत. 


महालचे झाले हॉटेल


हैदराबादमधल्या फलकनुमा पॅलेसमध्ये इवांकासाठी स्पेशल डिनरचं आयोजन करण्यात आलंय. एकेकाळी निजामाचा महाल असलेली ही वास्तू आता हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यात आलीय. या स्पेशल डिनरला पंतप्रधान मोदींसह काही विशेष पाहुणे उपस्थित रराहणार आहेत. 


सगळ्या जगाचे लक्ष


इवांका ट्रंपचं भारतात येणं हे राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जिचं ऐकतात, अशी ही इवांका आहे. पंतप्रधान मोदींनी इवांकाला भारतात बोलावून एका दगडात अनेक पक्षी मारलेत. इवांका भारतात येणार, म्हणून सगळ्या जगाचं भारताकडे लक्ष असणार. 


चीन आणि पाकिस्तानसाठीही इवांकाचं भारतात येणं, हा मोठा इशारा आहे. अमेरिकेचं भविष्यातनं नेतृत्व म्हणून जिच्याकडे पाहिलं जातंय, तिला भारतात उद्योजक परिषदेसाठी बोलावणं, हा परराष्ट्र धोरणाचा मोठा भाग आहे. 


हिऱ्यांचा नेकलेस भेट देणार 


अमेरिकेबरोबर उद्योग क्षेत्रातले आणि संरक्षण क्षेत्रातले संबंध यानिमित्तानं मजबूत करता येतील आणि त्याचबरोबर पाकिस्तान आणि चीन यांच्यावर वचकही राहणार आहे. तेलंगणा सरकार इवांकाला पोचमपल्ली साड्या आणि हिऱ्यांचा नेकलेस भेट देणार आहे.