नवी दिल्ली : अनेकदा अचूक वेळ साधणाऱ्या मानवाला जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींच्या वेळा साधण्यात मात्र अद्याप यश आले नाही. लोक मात्र अनेक वेळा दोन्ही वेळी देव, नशीब आणि इतरांना उगाच दोष देतात. अर्थात देव, नशीब यांना दोष दिला तर एक वेळ ठिक. कारण, दोन्हीवरचा राग काढण्यासाठी ते समोर नसतात. पण, दिल्लीतील एका पोलीस शिपायाने चक्क आपल्या मुलाच्या जन्माचा दोष एका पुजाऱ्यावर ठेवला आणि त्यानंतर जे घडले ते अनेकांना अवाक करणारे असे आहे.


पोलीस पोहोचताच पोलिसाने केला पोबारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटना आहे गाजियाबाद येथील गोविंदपुरम येथील. इथल्या एका पुजाऱ्याला एका पोलीस शिपायाने चोप दिला. इतका की पोलिसांच्या लाथा, बुक्क्या आणि काठीच्या माराने पुजारी पार काळानिळा पडला. जेव्हा पुजाऱ्याला पोलिसाच्या काठीचा प्रसाद असहय्य झाला तेव्हा, त्याने एका खोलीत स्वत:ला बंद करून घेतले आणि स्वत:चा जीव वाचवला. बंद खोलीतूनच त्याने १०० नंबरवर कॉल करून घडल्या प्रकाराची पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर हजेरी लावताच चोप देणाऱ्या 'त्या' पोलिसाने पोबारा केला.


घटनेचा सीसीटीव्ही उपलब्ध


दरम्यान, पीडित पुजाऱ्याने गोविंदपुरम पोलीस चौकीत मारहाण करणाऱ्या पोलिसाबाबत तक्रार दाखल केली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. कविनगर पोलीस स्थानकाचे प्रभारी समरजीत सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दिसत असून, त्यात एक व्यक्ती पुजाऱ्याला मारहाण करत असल्याचे दिसत आहे.


पुजाऱ्याने दिली होती मूळ कल्पना


पीडित पुजारी रामस्वरूप शर्मा यांनी सांगितले की, आरोपी पोलीस शिपाई आपल्याला डिसेंबर महिन्यात भेटला होता. त्याने आपली पत्नी गरोदर असून, तिची प्रसूती होण्यास योग्य दिवस कोणता असे विचारले होते. तसेच, मूळ नक्षत्राबाबतही त्याने आपल्याला विचारले होते. तेव्हा आपण, १८ आणि १९ डिसेंबरला मूळ नक्षत्र असल्याचे आपण त्याला सांगितले होते. मात्र, तरीही त्याने एकले नाही आणि त्याच तारखेला पत्नीची प्रसूती केली. त्यानंतर आरोपीने आपल्याला त्याच्या घरी पूजेसाठी बोलावले होते. मात्र, आपण आपल्या सहकाऱ्याला पाठवले होते, अशी माहितीही शर्मा याने दिली आहे.


दरम्यान, मूळ नक्षत्रावर बाळ जन्माला आल्याचा राग धरून आरोपी पोलीस शिपाई आपल्याला सतत धमकावत होता. अखेर रविवारी तो आपल्या कुटुंबियांना घेऊन मंदिरात आला आणि आपल्याला मारहाण केल्याचा दावा पुजाऱ्याने केला आहे.