नवी दिल्ली : राज्यामध्ये पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका अखेर संपल्या आहेत. सगळ्या मुद्द्यांवर आमचं एकमत झालं असल्याचं वक्तव्य या बैठकांनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. दिल्लीतल्या बैठका संपल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मुंबईला रवाना होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये आल्यानंतर निवडणुकीत आम्हाला साथ देणाऱ्या घटकपक्षांसोबत चर्चा करु. ही चर्चा झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेसोबत बैठक घेऊन चर्चा करतील. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम आणि खातेवाटपाबाबत माहिती दिली जाईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.


एकीकडे महाविकासआघाडीचं सरकार येण्याचं ठरत असतानाच आता मंत्रीमंडळातल्या संभाव्य नेत्यांची नावं समोर येऊ लागली आहेत. ३३ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्रीपदापैकी कॅबिनेट मंत्रिपदात समसमान फॉर्म्युलासाठी आग्रही राहण्याचं काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नेत्यांना सांगितल आहे.


महाशिवआघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आग्राही आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते, तर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं. राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी अजित पवार आग्रही असल्याचं समजतंय.


राष्ट्रवादीकडून मंत्रीपदी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, माणिकराव ठाकरे यांची मंत्रीपदी वर्णी लागणयाची चिन्हं आहेत.