नवी दिल्ली : गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. रविवारी, म्हणजेच १७ मार्चला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. वयाच्या ६३ व्या वर्षी पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना २०१८ मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं. तेव्हापासूनच पर्रिकर यांची प्रकृती ढासळत गेली आणि अखेर या आजाराचाच विजय झाला. पर्रिकर यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून दु:ख व्यक्त केलं जात आहे. कला, क्रीडा आणि राजकारण अशा क्षेत्रातील व्यक्तींनी पर्रिकर यांच्या जाण्याने एक सच्चा नेता हरपल्याची प्रतिक्रिया दिली. लोकसभेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सुमित्रा महाजन यांनीही देशाने आदर्श व्यक्तिमत्वं गमावल्याची भावना व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एक अत्यंत उर्जावान व्यक्तीमत्त्वं आपण गमावलं आहे. इतक्या मोठ्या आजाराचं निदान होऊनही शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत राहिले', असं म्हणत महाजन यांनी पर्रिकरांच्या लढाऊ वृत्तीला दाद दिली. याच लढाऊ वृत्तीविषयी वक्तव्य करत 'तू तुझं काम कर, मी माझं काम करतो असंच जणू त्यांनी या दुर्धर आजाराला सांगितलं होतं', असंही त्या म्हणाल्या. 


एक व्यक्ती म्हणून पर्रिकरांचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं, हे त्यांनी स्पष्ट केलं. साधं राहणीमान हा त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील एक महत्त्वाचा घटक. त्यांच्या याच अनोख्या शैलीमुळे देशातील तरुणाईही पर्रिकरांची खऱ्या अर्थाने 'फॅन' होती. हीच बाब अधोरेखित करत महाजन यांनी येणाऱ्या काळात राजकारणात सक्रिय होऊ पाहणाऱ्या तरुण पिढीने पर्रिकरांचा आदर्श घ्यावा असं सांगितलं.