`तिथे गेलो नाही याचं समाधान आहे`; नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावरुन शरद पवारांनी सुनावलं
New parliament : हवन-पूजेनंतर पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवन देशाला समर्पित केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनात तामिळनाडूच्या अधिनमने सुपूर्द केलेला सेंगोलही बसवला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे.
New parliament : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसदेच्या नव्या इमारतीचं (new parliament building) उद्घाटन पार पडलं आहे. विरोधी पक्षांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. देशातील 20 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी या कार्यक्रमाबाबत भाष्य केले आहे. हा सोहळा एकत्र बसून आणि चर्चा करुन केला असता तर ते अधिक चांगलं दिसला असता असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमावरुनही शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
"मी सकाळी कार्यक्रम पाहिला. मी त्या ठिकाणी गेलो नाही याच समाधान आहे. जे कर्मकांड सुरू होतं त्याच्यावरून असं दिसतंय की पंडित नेहरू यांनी जी आधुनिक लोकशाहीची संकल्पना मांडली पण या कार्यक्रमावरून देश मागे गेला आहे. तिथे जे काही घडले ते पाहून मला काळजी वाटते. आपण देशाला मागे नेत आहोत का? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना बोलवायला पाहिजे होतं. त्यांच्या भाषणानंतर अधिवेशन सुरू होते. राज्यसभेचा मी सदस्य आहे. त्याचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत पण त्यांची उपस्थिती दिसली नाही. हा कार्यक्रम मर्यादित लोकांसाठी होता का काय असं वाटत आहे. जुनी बिल्डिंगसोबत आमची बांधिलकी आहे. या बिल्डिंगची चर्चा काही मर्यादित लोकांसाठी होती का असा प्रश्न पडला आहे," असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"बाकीच्या सदस्यांना नक्की काय निमंत्रण दिलं माहिती नाही. माझ्या हातातही निमंत्रण आलेलं नाही. पण कदाचित माझ्या दिल्लीच्या घरी निमंत्रण पाठवलं असेल तर मला माहिती नाही. पण माझ्यापर्यंत तरी आलेलं नाही. असा सोहळा एकत्र बसून आणि चर्चा करुन केला असता तर ते अधिक चांगलं दिसलं असतं. मुख्यमंत्र्यांच्या बुद्धीला जे शोभतं तेच बोलतात," असाही टोला शरद पवार यांनी लगावला.
सरकारने राज्यसभेला हद्दपारच केलं - सुप्रिया सुळे
"तीन दिवसांपूर्वी मला फक्त एक व्हॉट्सअॅप मेसेज आला होता, संसदीय कमिटी मेंबर म्हणून तो मेसेज होता. आपली संसद हे लोकशाहीचं मंदिर आहे. आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो असतो तर दे देशासाठी जास्त संयुक्तिक वाटलं असतं," अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
"ओम बिर्ला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण उपराष्ट्रपतींना कार्यक्रमाला बोलावलं नाही. या सरकारने राज्यसभेला हद्दपारच केलं आहे. आपल्या देशात राज्यसभा आहे की नाही? या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींना बोलवायला हवं होतं. पण हा कार्यक्रम एका व्यक्तिचा आहे की, देशाचा तेच कळत नाही," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.