फरिदाबाद, हरियाणा :  कोरोनामुळे मास्क वापरणे सगळ्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही तर दंड आकारण्यात येत आहे. कोरोनाचे संकट कायम असेपर्यंत मास्क वापरणे बंधनकारक असले तरी गुन्हेगार त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरियाणामध्ये मास्कबाबत काही नवे नियम करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणामध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक आहे, असे आदेश हरियाणाच्या पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंड करण्याचेही आदेश दिले आहेत. त्या आदेशाचे पालन यापुढेही केले जाणार आहे. पण मास्क वापरण्याची सक्ती कायम ठेवतानाच फरिदाबादचे पोलीस आयुक्त के. के. राव यांनी काही ठिकाणी चेहऱ्यावरचा मास्क हटवण्याचेही आदेश दिले आहेत. गुन्हेगारांना रोखण्यासाठी त्यांनी हे आदेश दिले आहेत.


या ठिकाणी मास्क हटवावा लागणार


हळूहळू लॉकडाऊन उठवल्यानंतर दागिन्यांची दुकानं, शोरूम, पैशांचे व्यवहार, कर्ज देणाऱ्या कंपन्या, बँकांची कार्यालयं सुरु होतील. त्यातच दागिन्यांची दुकानं आणि शोरूम नेहमीच गुन्हेगारांच्या निशाण्यावर असतात. अशा परिस्थितीत गुन्हेगार गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक आहे. चेहऱ्यावर मास्क वापरून गुन्हेगार चोरी आणि लूट करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मास्कमुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतही त्यांना ओळखणे शक्य होणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांना पकडणे कठीण होईल.


त्यामुळे फरिदाबादचे पोलीस आयुक्त के. के. राव यांनी काही ठिकाणी मास्क हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक ज्वेलरी शॉप, शोरूम, बँक, खाजगी फायनान्स कंपन्या आणि गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यांच्या कार्यालयात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर उभी राहून आपल्या चेहऱ्यावरचा मास्क बाजुला करेल. त्यामुळे अशा ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तिचा चेहरा कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल.


दुकानातील किंवा कार्यालयातील काम आटोपल्यानंतर पुन्हा सीसीटीव्ही समोर मास्क लावेल आणि बाहेर पडेल. पोलीस आयुक्तांचा हा आदेश सर्व दुकानं आणि कार्यालयांना उपलब्ध करून द्यावा, म्हणजे ते दरवाजावरच तो लावू शकतील, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.


याशिवाय पोलीस प्रवक्त्यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, कोणतीही व्यक्ती भेटायला आली तर दरवाजा उघडण्यापूर्वी त्या व्यक्तिला मास्क चेहऱ्यावरून हटवायला सांगा. जेणेकरून व्यक्तिची ओळख पटेल. अशा पद्धतीने सावधानता बाळगण्याचे आदेश फरिदाबाद पोलिसांनी दिले आहेत.


 



अन्य ठिकाणीही मास्कचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्यासाठी काही नियम करावे लागणार आहेत.