आता, कायमस्वरुपी टॅटूही कायमचे मिटवता येणार...
यामुळे त्वचेचं कायाकल्प करता येणं शक्य आहे. सोबतच या तंत्रज्ञानामुळे कायमस्वरुपी टॅटूही पूर्णत: हटवता येणं शक्य आहे.
मुंबई : सध्याचा फॅशन ट्रेन्ड लक्षात घेता अनेक तरुण - तरुणींच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या प्रकारचे कलरफूल टॅटू गोंदवून घेतले... ज्या प्रकारचा मूड, त्या प्रकारचे टॅटू... मग, प्रेमात असताना प्रियकराचं नाव गोंदवून घेतलं... किंवा दोघांनीही सारखेच टॅटू गोंदवून घेतले तर मग ब्रेकअपनंतर या टॅटूचं काय करायचं? यांसारखे प्रश्न मग या प्रेमबहाद्दरांना भेडसवायला लागतात... मग अनेक जण या टॅटूमध्ये काही बदल करून घेतात... किंवा ते टॅटू काढण्यासाठी आपल्या शरीरावर काही बाही प्रयोग करतात... पण आता मात्र असं काहीही करण्याची गरज भासणार नाही. कारण, हे टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय.
मेडिकल डिव्हाईस बनवणारी कंपनी ल्युमेनिस इंडियानं पहिल्यांदाच भारतात क्रांतिकारी तंत्रज्ञान 'नॅच्युरल क्युएस' लॉन्च केलंय. यामुळे त्वचेचं कायाकल्प करता येणं शक्य आहे. सोबतच या तंत्रज्ञानामुळे कायमस्वरुपी टॅटूही पूर्णत: हटवता येणं शक्य आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, 'नॅच्युरल क्युएस' जगातील एक उच्च दर्जाची क्यू स्विच्ड प्रणाली आहे. हे तंत्रज्ञान प्रत्येक रंग आणि प्रत्येक आकाराचे टॅटू हटवण्यासाठी सक्षम आहे. सोबतच त्वचेवरचे केस हटवण्यासाठीही हे तंत्रज्ञान मदत करतं.
भारतात 'नॅच्युरल क्युएस' पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आलंय. हे तंत्रज्ञान सध्या दिल्ली स्थित डॉ. पीएन बहल स्किन इन्स्टीट्युट अॅन्ड स्कूल ऑफ डर्माटोलॉजीमध्ये लावण्यात आलंय.
टॅटू काढल्यामुळे सैन्यात जाण्याच्या संधीही तरुणांना सोडाव्या लागल्या आहेत. अशा तरुणांसाठीही हे तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे.