करा नववर्षाचं स्वागत, एका रात्रीसाठी हॉटेलचा दर ११ लाख!
विशेष म्हणजे हॉटेलमधील रुम्सचे दर वाढलेले असले, तरी आतापर्यंत या दोन्ही ठिकाणच्या जवळपास सर्वच हॉटेल्समधील रुम्स बुक झाल्या आहेत.
नवी दिल्ली - नववर्ष अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. पुढल्या आठवड्यात कडू-गोड आठवणींसह २०१८ला निरोप दिला जाईल आणि २०१९ चे जल्लोषात स्वागत केले जाईल. अनेकजण वेगवेगळ्या पर्यटनस्थळी जाऊन नववर्षाचे स्वागत करतात. त्यामुळे पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेल्सना आणि रेस्तराँना यावेळी महत्त्व येते. राजस्थानमधील जोधपूर आणि उदयपूर या दोन्ही ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथील हॉटेल्सनी आधीपासूनच दिवसाचे रेटकार्ड तयार केले आहे. जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस आणि उदयपूरमधील ताज लेक पॅलेसमध्ये एका रात्रीसाठी थांबण्याचे दर तब्बल ११ लाखांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याचे वृत्त दिले आहे.
विशेष म्हणजे हॉटेलमधील रुम्सचे दर वाढलेले असले, तरी आतापर्यंत या दोन्ही ठिकाणच्या जवळपास सर्वच हॉटेल्समधील रुम्स बुक झाल्या आहेत. ज्या हॉटेल्समध्ये अद्याप रुम उपलब्ध आहेत. तिथेही दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. जयपूरमधील रामबाग पॅलेसमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री एक्सक्लुझिव्ह सूट्सचे दर मोठ्या प्रमाणात वाढतात. यावर्षी नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये रुम्सचे दर ४० टक्क्यांनी वाढले आहेत. या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी साडेआठ लाख रुपये आकारले जातात. याशिवाय ग्राहकांना जीएसटी वेगळाच द्यावा लागतो.
राजस्थानमध्ये ३१ डिसेंबरला सर्वच हॉटेल्समध्ये रुम बुकिंग ९८ टक्क्यांपर्यंत भरलेले असते. फक्त एक ते दोन टक्के रुम उपलब्ध ठेवल्या जातात. पण ज्यांना या रुम हव्या असतात. त्यांच्याकडून भरमसाठ पैसे आकारले जातात. कोणतेही हॉटेल पूर्णपणे भरलेले आहे, असे शक्यतो दाखवले जात नाही. त्यामुळे त्यांच्या ऑनलाईन रॅकिंगवर परिणाम होऊ शकतो, असे रेडिसन जयपूर सिटी सेंटरचे महाव्यवस्थापक राजेश राजपुरोहित यांनी सांगितले.