आसाम : आसामच्या कछार जिल्ह्यात एका महिलेने चक्क 5.2 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे. राज्यतील सर्वात जास्त वजनाचे हे पहिले बाळ असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, या बाळाच्या जन्मानंतर इतर रुग्णालयातून माहिती घेण्यात आली. मात्र याआधी एवढ्या वजनाचे बाळ कधीच जन्माला आले नाही असे सांगण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, सिलचरच्या कनकपुर पार्ट-2 क्षेत्रात राहणारी 27 वर्षीय गर्भवती महिला जया दासला 17 जूनला सतींद्र मोहन देव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला 29 मेलाच प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. परंतु काही कारणास्तव त्या तारखेला ती आली नाही.


20 दिवस उशिराने सुरू झाल्या प्रसुतीकळा


रुग्णालयाचे डॉ. हनीफ मोहम्मद अफसर आलम म्हणाले, या महिलेवर सुरूवातीपासून उपचार सुरू होते. "गर्भवती महिलेला 29 मेलाच दाखल होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, जवळपास 20 दिवस उशिराने म्हणजेच 17 जूनला तिला प्रसुतीकळा येण्यास सुरूवात झाली."


ते पुढे म्हणाले, जयाचे पहिले बाळ सिजेरियनने झाले आहे. त्यामुळे त्यांनी शेवटची सोनोग्राफी सुद्धा केली नाही. आपात्कालीन परिस्थितीत तिला भरती करण्यात आले. त्यानंतर सामान्य रुग्णालयात जयाची सिजेरियन पद्धतीने डिलिव्हरी करण्यात आली.


यावेळी जयाने चक्क 5.2 किलोच्या बाळाला जन्म दिला. डिलिव्हरी उशिराने झाल्यामुळे बाळाचे वजन इतके असेल असा अंदाज आला नाही. बाळ आणि आई दोघेही पूर्णपणे स्वस्थ आहेत. सहसा नवजात बाळाचे वजन 2.5 किलो किंवा 3 किलोपर्यंत असते.



याविषयी अनेक डॉक्टरांनी चर्चा केली. यावरुन आतापर्यंत  5 किलोहून अधिक वजनाचे बाळ जन्माला आले नाही. अशी माहिती त्यांना मिळाली. आसाममध्ये सर्वात जास्त वजन असलेले हे  बाळ पहिलेच असल्याचा दावा डॉ. आलम यांनी केलाय. जया दास आणि बादल दास यांचे हे दुसरे अपत्य आहे. त्यांच्या पहिल्या बाळाचे वजन 3.8 किलो होते.