केंद्रीय तपास यंत्रणा राष्ट्रीय तपास संस्थेचं (NIA) एक पथक दुबईत (Dubai) दाखल झालं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि डी गँगविरोधात (D Gang) परदेशात कारवाई कऱण्याच्या हेतूने एनआयएने पाच सदस्यांच्या तपास पथकाला दुबईत पाठवलं आहे. हे पथक दुबईतील स्थानिक प्रशासनाला डी गँगबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तसंच दुबईत राहून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी (Terrorist) आणि गँगस्टर्सविरोधात (Gangsters) कारवाईची मागणी करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनआयए मुख्यालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुबईत गेलेल्या अधिकाऱ्यांची नाव उघड केली जाऊ शकत नाहीत. डी कंपनीविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आम्ही बरीच माहिती आणि पुरावे गोळा केले आहेत. आम्ही अनेक आरोपींचे जबाब नोंदवले आहेत. तसंच याच प्रकरणी अनेक आरोपींना अटकही करण्यात आली आहे. मात्र पुढील तपासासाठी परदेशातील तपास यंत्रणांची मदत लागू शकते. त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाऊ शकते.


एनआयएने गतवर्षी 2022 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह अन्य आरोपींविरोधात UAPA कायद्यांतर्गंत (Unlawful Activities Prevention Act) गुन्हे दाखल केले होते. एनआयएचं पथक दाऊद इब्राहिमसह त्याच्या डी कंपनीविरोधात तपास करत आहे. तसंच याच्याशी संबंधित आरोपींविरोधात येणाऱ्या काळात मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये लपून आहे. पाकिस्तानातूनच दाऊद भारतविरोधी कारवाया करत असून दहशतवाद आणि ड्रग्जला चालना देत आहे. यामुळेच केंद्राने गांभीर्य लक्षात घेता हा तपास एनआयएकडे सोपवला आहे. सीबीआयकडेही याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात मुंबईसह अनेक ठिकाणांहून आरोपींना अटक करण्यात आली असून, बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात आली आहे.