पाटणा, मुजफ्फरपूर : बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात मेंदूज्वरानं थैमान घातलेलं दिसतंय. शुक्रवारी एकाच दिवशी या जीवघेण्या आजाराला नऊ मुलं बळी पडली आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत मेंदूज्वरानं मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची संख्या ६३ वर पोहचलीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व मुलं 'हायपोग्लीसेमिया'ची बळी ठरलीत. 'हायपोग्लीसेमिया' या आजारात शरीरातील रक्तशर्करेचं प्रमाण वेगानं घटत जातं आणि शरीरातील इलेक्ट्रोलाईट असंतुलीत होत जातं. मुजफ्फरपूरच्या दोन सरकारी रुग्णालयात मृतांचा आकडा तब्बल ६३ वर केलाय. यापैंकी एका रुग्णालायला आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी धावती भेट दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा प्रशासनाकडून अधिकृतपणे देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज रुग्णालयात (एसकेएमसीएच) सहा आणि केजरीवाल रुग्णालयात तीन मुलांचा मृत्यू झालाय. 


एसकेएमसीएचमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैंकी नऊ मुलांची प्रकृती गंभीर आहे. तर केजरीवाल रुग्णालयात पाच मुलांची प्रकृती नाजूक अवस्थेत आहे.  


आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या एका बैठकीनंतर, शुक्रवारपासून आणखीन सहा ऍम्ब्युलन्स उपलब्ध केल्या जातील. तसंच १०० बेड असणाऱ्या नव्या वॉर्डचं संचालन लवकरच सुरू करण्यात येईल, असं म्हटलंय. हा आजार रोखण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. परंतु, सध्या सरकारी रुग्णालयात मात्र बेडही कमी असल्यानं रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं सत्य मात्र ढळढळीतपणे समोर आलंय.