नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील तब्बल १२ हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा सूत्रधार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला बुधवारी लंडनमध्ये अटक करण्यात आली. यानंतर नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या हालचालींना प्रचंड वेग आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग ( सीबीआय) आणि अंमलबजावणी संचलनालयातील (ईडी) अधिकाऱ्यांच्या मते विजय मल्ल्यापेक्षा नीरव मोदीची प्रत्यार्पण प्रक्रिया अधिक वेगाने पार पडू शकते. यासाठी जास्तीत जास्त सहा महिन्यांचा कालावधी लागेल. विजय मल्ल्याच्या तुलनेत नीरव मोदीविरोधातील पुरावे अधिक भक्कम आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील दुहेरी गुन्हेगार या कलमाखाली नीरव मोदी दोषी ठरतो. नीरव मोदीची अटक भारताच्यादृष्टीने मोठे यश असले तरी त्याची प्रत्यार्पण प्रक्रिया रेंगाळण्याची भीती होती. मात्र, सीबीआय आणि ईडी यांनी यापूर्वीच नीरव मोदीविरोधात न्यायालयात सविस्तर आरोपपत्र सादर केले आहे. यामध्ये नीरव मोदीने 'पीएनबी'कडून कर्ज घेताना सादर केलेल्या खोट्या ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू)’, ईमेल्स आणि बनावट कंपन्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केल्याच्या पुराव्यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे यापूर्वीच इंग्लंडमधील अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यामुळे नीरव मोदीची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, नीरव मोदीला या अटकेने मोठा धक्का बसला आहे. आगामी काही दिवसांत आपल्याविरुद्ध कारवाई होणार याची कुणकुण नीरवला होती. त्यासाठी नीरव मोदीने आपल्या वकिलांकरवी योग्य तयारीही केली होती. परंतु, काल येथील मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी गेले असताना पोलिसांनी नीरव मोदीला ताब्यात घेतले. यानंतर त्याला वेस्टमिनिस्टर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी नीरव मोदीने तात्काळ जामीन देण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने हा जामीन फेटाळत २९ मार्चपर्यंत नीरवला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.