मुंबई: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल १४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करुन फरार झालेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी अखेर लंडनमध्ये फिरताना सापडला आहे. 'द टेलिग्राफ'च्या पत्रकाराने शुक्रवारी नीरव मोदीला गाठले. यावेळी त्याने मोदीला काही प्रश्नही विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, नीरव मोदीने त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता तेथून काढता पाय घेतला. या सगळ्या प्रकारानंतर नीरव मोदीविषयी तोंडात बोटे घालायला लावेल, अशी माहिती पुढे आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे भारतात सरकारने नीरव मोदीच्या अनेक मालमत्तांवर टाच आणली आहे. मात्र, तरीही नीरव मोदीचा थाट जरादेखील कमी झालेला नाही. मोदी लंडनमध्ये राजेशाही थाटात जगत असल्याचे दिसत आहे. 'द टेलिग्राफ'कडून नीरव मोदीला प्रश्न विचारतानाच व्हीडिओ ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या व्हीडिओत नीरवच्या अंगावर शहामृगाच्या कातडीपासून तयार करण्यात आलेले महागडे जॅकेट दिसत आहे. बाजारपेठेत सध्या या जॅकेटची किंमत १० हजार युरो इतकी आहे. याशिवाय, नीरव मोदीचे वास्तव्य लंडनच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या सेंटर पॉईंट टॉवर ब्लॉक या प्रसिद्ध इमारतीमध्ये आहे. याठिकाणी त्याचा तीन खोल्यांचा अलिशान फ्लॅट आहे. सध्याच्या घडीला या इमारतीमधील फ्लॅटचे महिन्याचे भाडे साधारण १७००० युरो इतके आहे. तर बाजारभावानुसार या जागेची किंमत ८ कोटी युरो इतकी असल्याचे समजते. एवढेच नव्हे तर नीरव मोदीने लंडनमध्ये हिऱ्यांचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. सोहो परिसरात त्याचे कार्यालय आहे.  एकूणच भारतामधील मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईचा नीरव मोदीला कोणताही फरक पडल्याचे दिसत नाही. त्यामुळे भारतातील मालमत्ता जप्त केल्याने नीरव मोदी शरण येईल, ही केवळ भाबडी आशा ठरण्याची शक्यता आहे. 



यापूर्वी नीरव मोदी जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये दिसून आल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, नीरव मोदीचा नेमका पत्ता लागला नव्हता. मात्र, आता नीरव मोदी लंडनमध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याठिकाणी त्याच्याकडून राजकीय आश्रय मिळवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि परराष्ट्र मंत्रालय काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी मद्यसम्राट विजय मल्ल्या यानेही भारतीय बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून लंडनमध्ये आश्रय घेतला होता. नीरव मोदीनेही आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवल्याचे दिसत आहे.