नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना २१ जानेवारी रोजी फाशी दिली जाणार आहे. या आदेशानंतर दोषींच्या कुटुंबीयांना त्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात येतेय. तिहार तुरुंगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषी मुकेश याच्या आईनंही तुरुंगात आपल्या मुलाची भेट घेतली. सध्या ही परवानगी सर्वच दोषींना देण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, दोषी मुकेश याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दोषीचं कुटुंब त्यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात आलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिहार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाकडून डेथ वॉरंट जारी केलं गेल्यानंतर निर्भयाचे सर्व दोषींना वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलंय. तुरुंग प्रशासनानं उत्तरप्रदेशच्या दोन जल्लादांना पाचारण केलंय. यामध्ये एक पवन जल्लादचाही समावेश आहे. सर्व दोषींना सध्या साधं इतर दोषींना दिलं जाणारं जेवण दिलं जातंय. आपली संपत्ती कुणाच्या नावे करायची असल्यास सांगण्यासही दोषींना सांगण्यात आलंय. परंतु, अद्याप यावर कोणतंही उत्तर आलेलं नाही.


क्युरेटिव्ह पिटिशनवर १४ जानेवारी रोजी सुनावणी


निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांनी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी, १४ जानेवारी रोजी सुनावणी करणार आहे. न्या. रमन्ना, न्या. अरुण मिश्रा, न्या. नरीमन, न्या. भानुमती आणि न्या. अशोक भूषण यांचं पीठ क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी करणार आहे. एखाद्या दोषीची राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलेली द्या याचिका आणि सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात आलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली तर दोषी व्यक्ती क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करू शकतात. 



७ जानेवारी २०२० रोजी न्यायालयानं चारही दोषी पवन गुप्ता, मुकेश सिंह, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर यांच्या फाशीचं वॉरंट जारी केलं. २२ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.०० वाजता या नराधमांना फासावर चढवण्यात येणार आहे. दिल्ली तिहार जेल क्रमांक -३ मध्ये असलेल्या फाशीघरात या शिक्षेची अंमलबजावणी केली जाईल. 


या प्रकरणातील एक आरोपी राम सिंह यानं तिहार तुरुंगातच फाशी लावून घेत आत्महत्या केली होती. तर आणखी एक आरोपी घटना घडली त्यावेळी अल्पवयीन असल्यानं त्याला ज्युवेनाईल कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं.