नवी दिल्ली : १६ डिसेंबर २०१२ ला देशाला हादरवणारी घटना दिल्लीमध्ये घडली. एका पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर (निर्भया) ६ जणांनी चालत्या बसमधून बलात्कार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिच्यासोबत असलेल्या मित्राला मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला. आज ७ वर्षांनी यातील चौघा दोषींना फाशीची शिक्षा झाली. यानंतर देशभरात आनंद साजरा करण्यात आला. यातील एका मुख्य आरोपीने आत्महत्या केली. तर एकजण त्यावेळी अल्पवयीन असल्याने त्याची या प्रकरणातून सुटका झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज निर्भयाच्या आरोपींना शिक्षा झाल्यानंतर देशभरात या मुद्द्यावर चर्चा होत आहे. आज झालेल्या न्यायामुळे गुन्हे करणाऱ्यांना चपराक बसेल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिली. निर्भयाच्या आईने हा लढा असाच सुरु राहणार असे सांगितले. 


दरम्यान या घटनेत सहभागी असलेला पण त्यावेळी अल्पवयीन असलेल्या मुलाबद्दल देखील पुन्हा एकदा चर्चा झाली.  या आरोपीला शिक्षेतून सुट मिळू नये यासाठी जोरदार मागणी करण्यात आली. ३१ ऑक्टोबर २०१३ला अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाईल बोर्डाने दोषी ठरवलं आणि त्याची रवानगी ३ वर्षांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली. त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची रवानगी दक्षिण भारतातील एका अज्ञात ठिकाणी करण्यात आली आहे. तिथे तो एका उपहारगृहात स्वयंपाकी म्हणून काम करतोय. बालसुधारगृहातील शिक्षेदरम्यान तो स्वयंपाक बनवायला शिकला होता. त्या अनुभवाचा फायदा तो आता घेत आहे. 



त्याने आपली शिक्षा पूर्ण केली असून त्याच्यामध्ये चांगली सुधारणा झाल्याचे सांगितले जात आहे. तो काम करत असलेल्या उपहारगृहाच्या मालकाला देखील त्याच्या भूतकाळाविषयी माहिती नाही. तसेच कोणाला कळू देखील नये यासाठी काळजी देखील घेतली जात आहे.