`तिहार जेल`ने बोलावले दोन जल्लाद, निर्भयाच्या दोषींना लवकरच फाशी?
निर्भया प्रकरणातील चारही दोषी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैदेत आहेत.
नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीच्या 'निर्भया' प्रकरणातल्या दोषींना फाशी कधी होणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. निर्भया प्रकरणातील चारही दोषी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैदेत आहेत. विनय शर्माच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींकडून लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. अस असतानाच आता उत्तर प्रदेशहून तिहार जेलमध्ये दोन जल्लादांना बोलवण्यात आलं आहे.
मेरठमधील पवन जल्लाद यांना दिल्लीतील तिहार जेलमध्ये बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दोषींना फाशी झाली पाहिजे. माझी पूर्ण तयारी असून जेव्हा तिहार जेलमध्ये बोलवण्यात येईल, त्यावेळी जाणार असल्याचं ते म्हणाले. फाशी देण्याआधी आरोपींची ट्रायल होणार असून त्यांचं वजन तपासलं जाणार आहे. त्यानंतर इतरही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार असल्याचं पवन यांनी सांगितलं.
तिहार जेलमधील अधिकाऱ्यांनी, उत्तर प्रदेशच्या जेल विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून पवन यांना दिल्लीला पाठवण्याचं सांगितलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये केवळ दोन जल्लाद आहेत. उत्तर प्रदेश कारागृहचे महासंचालक आनंद कुमार यांनी तिहारमधून पत्र मिळाल्याचं सांगितलं आहे. तिहार जेल प्रशासनाला आम्ही उत्तर दिलं असून आवश्यक त्या दिवशी जल्लाद पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
फाशीची देण्याची प्रक्रिया
राष्ट्रपतींकडून दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर १४ दिवसांच्या आत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. राष्ट्रपतींचा निर्णय आल्यानंतर न्यायालय फाशी देण्यासाठी ब्लॅक वॉरंट जाहीर करतं. ज्यात फाशी देण्याची तारिख आणि वेळ नमूद करण्यात येते. त्या ब्लॅक वॉरंटची एक कॉपी आरोपीलाही दिली जाते. त्यानंतर आरोपीला त्याच्या कुटुंबियांना भेटण्याची मुभा दिली जाते.
फाशी देण्यावेळी त्या जागेवर जल्लादशिवाय केवळ चार लोक हजर असतात. जेल अधीक्षक, एसडीएम आणि दोन वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतात.