निर्भया बलात्कारप्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला फासावर लटकवणार
२२ जानेवारीला सकाळी सात वाजता या चौघांना फाशी देण्यात येईल.
नवी दिल्ली: संपूर्ण देशाला सुन्न करून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना २२ जानेवारीला फासावर लटकवण्यात येणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी या चारही दोषींचे डेथ वॉरंट जारी केले. त्यानुसार २२ जानेवारीला सकाळी सात वाजता या चौघांना फाशी देण्यात येईल. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आज या प्रकरणाची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. या बलात्कारप्रकरणातील दोषींना सध्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. आजच्या सुनावणीदरम्यान सर्वप्रथम दोषी विनयला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यानंतर अक्षय, मुकेश आणि पवन यांचीही हजेरी झाली. यावेळी न्यायालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. यावेळी न्यायमूर्तींनी दोषांनी तुम्हाला जी काही बाजू मांडायची आहे, ती आत्ताच मांडून घ्या, असे सांगितले. तसेच दोषींना फाशी दिल्यामुळे जरब निर्माण होईल, असे मत यावेळी न्यायमूर्तींनी व्यक्त केले.
तिहार तुरुंगातच या सर्वांना फाशी दिली जाणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून तुरुंग प्रशासनाकडून तयारी सुरु होती. फाशी देण्यासाठी विशेष जागा तयार करण्यात आल्याचे समजते. याठिकाणी भुयारही तयार करण्यात आले होते. फाशी दिल्यानंतर या भुयारातूनच मृत शरीर बाहेर काढले जाते. १९ डिसेंबरला दोषींची पूर्नविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. यानंतर एक महिन्याच्या आत क्यूरेटिव अर्ज करण्याचा पर्याय असतो. त्यानुसार दोषींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच या दोषींनी राष्ट्रपतींकडेही द्या याचिका दाखल केली आहे. परंतु निर्भया प्रकरणातील दोषींना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.
सुनावणीवेळी आरोपींचे वकील आणि निर्भयाच्या आईमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. दोषी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप निर्भयाच्या वकिलांनी केला. तर आमच्या पक्षकारांना क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करायची आहे, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. माझ्या अशिलांना मी भेटू शकलो नाही. त्यांचा तुरुंगात मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप करत दोषींच्या वकिलांनी कोर्टात नवीन याचिका दाखल केली. तर निर्भयाच्या कुटुंबीयांनी चारही दोषींच्या विरोधात लवकरात लवकर डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी केली.
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री निर्भयावर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यावेळी दोषींनी तिच्यावर अनन्वित अत्याचार आणि जबर मारहाणही केली होती. यानंतर तिला जखमी अवस्थेत बसमधून फेकून देण्यात आले. अखेर सिंगापूर येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला होता.