निर्भयाच्या मारेकऱ्यांची उद्याची फाशी अटळ; सर्व याचिका फेटाळल्या
पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंह यांनी दुसऱ्यांदा केलेली दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली.
नवी दिल्ली: निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका गुरुवारी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. तसेच पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंह यांनी दुसऱ्यांदा केलेली दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली. त्यामुळे निर्भयाच्या चारही मारेकऱ्यांची उद्याची फाशी अटळ मानली जात आहे.
उद्या सकाळी साडेपाच वाजता मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघांना फाशी देण्यात येईल. त्यासाठी तिहार तुरुंगात सर्व तयारी झाली आहे. फाशी देणारा जल्लाद पवनही दोन दिवसांपूर्वीच तिहार तुरुंगात दाखल झाला होता. यानंतर फाशी देण्याची तालीमही झाली होती. त्यानुसार आता उद्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाईल.
निर्भया प्रकरणातील दोषीच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज
गेल्या काही दिवसांमध्ये फाशीची शिक्षा टाळण्यासाठी दोषींनी जंगजंग पछाडून पाहिले होते. दोषी मुकेश सिंह याने निर्भयावर अत्याचार झाले त्यादिवशी मी दिल्लीतच नव्हतो असा कांगावा करत उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली होती. त्यामुळे आपल्या फाशीला स्थगिती द्यावी, असे मुकेशचे म्हणणे होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी ही याचिका फेटाळून लावली होती.
निर्लज्जपणाचा कळस... निर्भया प्रकरणातील आरोपी म्हणतो तेव्हा मी दिल्लीत नव्हतोच
तत्पूर्वी दोषींच्या वकिलांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली होती. दोषींच्या वकिलांकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पत्र लिहण्यात आले आहे. यामध्ये २० मार्चला दोषींना देण्यात येणाऱ्या फाशीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.