नवी दिल्ली : निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्यासाठी काही तासच उरले आहेत. पण तरीही फाशी टाळण्यासाठी त्यांची धडपड सुरूच आहे. निर्भयाच्या गुन्हेगारांनी कायद्यातील सर्व उपलब्ध पर्यायांचा आधार घेत फाशी टाळण्यासाठी प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. उद्या पहाटे साडेपाच वाजता चारही दोषींना फाशी देण्याचं निश्चित झालं असताना फाशी टाळण्यासाठी कोर्टाचे दरवाजे खटखटावले आहेत. निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन यानं दयेचा अर्ज पुन्हा फेटाळण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी फाशी थांबवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केलीय. दिल्ली हायकोर्टात काही वेळातच याची सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठात याबाबत सुनावणी होणार आहे. हायकोर्ट फाशी थांबवण्याची मागणी फेटाळण्याचीच शक्यता असून उद्या पहाटे साडेपाच वाजता चारही दोषींना फाशी दिली जाईल हे निश्चित मानलं जातंय. 


याआधी तीन वेळा चौघांना फाशी देण्याबाबत डेथ वॉरंट काढलं होतं. पण न्यायालय आणि राष्ट्रपतींकडे याचिका आणि दयेचा अर्ज करून त्यांनी फाशी टाळली होती. पण आता दोषींकडे फारसे पर्याय उरले नसून उद्या पहाटे साडेपाच वाजता त्यांना फासावर लटकवलं जाईल अशीच शक्यता जास्त आहे.