Gold Stamp Duty: आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी घटवली आहे. कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन थेट 6 टक्क्यांवर आली आहे. म्हणजेच तब्बल 9 टक्क्यांनी कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. कस्टम ड्युटी कमी झाल्यानंतर सराफा बाजारात आनंदाचं वातावरण आहे. मात्र, त्याचबरोबर व्यापाऱ्यांना एक भीती सतावत आहे ती म्हणजेच जीएसटीची. सरकार जीएसटी वाढवू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं तुम्हाला जर सोनं खरेदी करायचे आहे तर आत्ताच तुमच्यासाठी योग्य संधी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन, चांदी आणि प्लॅटिनम या मौल्यवान धातुंच्या कस्टम ड्युटीत 9 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. म्हणजेच आता कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळं सोनं स्वस्त होणार आहे. सोनं किती स्वस्त होणार आहे. यावर एक नजर, सोनं प्रतिकिलो 5 लाख 90 हजार रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर, चांदी प्रतिकिलो 7,600 रुपयांनी स्वस्त होणार, प्लॅटिनमवर 1900 ते 2000 रुपयांची घट होणार आहे. हा सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा आहे. मात्र, कस्टम ड्युटी कमी केल्याचा सरकारला एक फायदादेखील झाला आहे. सोव्हरिन बॉन्ड गोल्डचे रिडम्प्शनवर सरकारला 9 हजार कोटी रुपये कमी द्यावे लागणार आहे. 


केंद्र सरकारने सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला असला तरी एकीकडे व्यापाऱ्यांच्या मनात एक भीतीदेखील आहे. लवकरच जीएसटी कौंसिलची बैठक होणार आहे. या बैठकीत जीएसटीमध्ये वाढ केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. सध्या सोनं-चांदीवरील जीएसटी 3 टक्के इतका आहे. तोच जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच कस्टम ड्युटी 9 टक्क्यांनी कमी करुन सरकार जीएसटी 12 टक्के करु शकते. त्यामुळं पुन्हा सोनं महाग होण्याची शक्यता आहे. अशी माहिती इंडियन बुलियन मार्केटचे सेक्रेटरी सुरेंद्र मेहता यांनी दिली आहे.


कस्टम ड्युटी घटवल्यानंतर आता तरी सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळं येत्या चार ते सहा महिन्यात तुम्ही सोनं खरेदी करु शकता. कारण त्यानंतर सोनं पुन्हा महाग होण्याची शक्यता आहे. कस्टम ड्युटी घटवल्यानंतर 70,000 रुपयांपर्यंत सोन्याच्या किंमती खाली येऊ शकतात. त्यामुळं तुमच्या घरी येत्या काही काळात लग्न समारंभ असेल तर तुम्ही या चार ते सहा महिन्यात सोनं खरेदी करुन ठेवा.