नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका सरकारी अधिकाऱ्याचे ट्विट करून कौतुक केले. या अधिकाऱ्याचे नाव कुलदीप कुमार शर्मा असून ते अर्थमंत्रालयाच्या छपाईखान्यात उप-प्रबंधक पदावर कार्यरत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ जानेवारीला कुलदीप शर्मा यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र, सरकारी नियमांमुळे कुलदीप शर्मा यांनी अजून वडिलांचे अंत्यदर्शन घेतलेले नाही. नॉर्थ ब्लॉकमध्ये २० जानेवारीला हलवा पार्टी झाल्यानंतर अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात झाली होती. यानंतर अर्थसंकल्प सादर होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयातच राहावे लागते. अर्थसंकल्पातील गोपनीय माहिती बाहेर फुटू नये, म्हणून ही खबरदारी बाळगली जाते. 


Budget 2020 : साऱ्यांचं लक्ष लागलेल्या अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास जरुर वाचा


मात्र, कुलदीप शर्मा यांच्या वडिलांचे २६ जानेवारीला निधन झाल्याने त्यांच्यासमोर पेच उभा राहिला होता. परंतु, शर्मा यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत घरी न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अर्थसंकल्पाच्या छपाईच्या कामावरच लक्ष केंद्रित केले. 



कुलदीप शर्मा गेल्या ३१ वर्षांपासून अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम बघत आहेत. अत्यंत कमी काळात अर्थसंकल्पाच्या प्रती छापायच्या असल्याने हे काम आव्हानात्मक असते. अशावेळी शर्मा यांच्या अनुभवी अधिकाऱ्याने अर्थमंत्रालयात उपस्थित राहणे आवश्यक असते. कुलदीप शर्मा यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत याठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. यासाठी अर्थ मंत्रालयाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.


केंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे - अजित पवार