नितीन गडकरींना शिमल्यातील प्रचारसभेनंतर भोवळ
सध्या गडकरी यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बुधवारी शिमला येथील प्रचारसभा आटोपल्यानंतर भोवळ आल्याचा प्रकार घडला. किन्नौर जिल्ह्यातील जाहीर सभा उरकून ते हॉटेलवर परत आले. हॉटेलमध्ये आल्यानंतर काही वेळातच त्यांना भोवळ आली. यानंतर तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. सध्या गडकरी यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.
राज्यातील मतदान संपल्यानंतर नितीन गडकरी आपल्या कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी शिमल्यात दाखल झाले आहेत. मात्र, सुट्टीवर असूनही त्यांनी आज सांगला येथील प्रचारसभेला मार्गदर्शन केले. या सभेहून शिमला येथे हॉटेलवर परतल्यानंतर गडकरी कार्यकर्त्यांना भेटणार होते. मात्र, तिथे अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आले.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी ट्विट करून आपली प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही त्यांनी बजावले आहे.
काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील प्रचारसभेदरम्यानही नितीन गडकरींना भोवळ आली होती. यावेळी उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने गडकरी भाषण थांबवून खाली बसले होते. यानंतर डॉक्टरांकडून प्राथमिक तपासणी झाल्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले होते. तत्पूर्वी डिसेंबर महिन्यातही राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही गडकरींना चक्कर आली होती.
नितीन गडकरी हे भाजपच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. त्यासाठी गडकरी पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे देशभरात प्रचार करतायत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये त्यांनी देशभरात तब्बल ५० प्रचारसभा घेतल्या. यापैकी २७ प्रचारसभा या महाराष्ट्रात झाल्या होत्या.