`दोन वर्षांच्या आत...` चारचाकी वाहनांसंदर्भात नितीन गडकरींकडून मोठ्या बदलांचे स्पष्ट संकेत
Nitin Gadkari: गडकरी म्हणाले म्हणजे आता हा बदल फार दूर नाही... का सुरुये त्यांच्या या वक्तव्याची इतकी चर्चा? पाहा सविस्तर वृत्त
Nitin Gadkari: देशातील वाहतूक व्यवस्थेमध्ये गेल्या काही वर्षांपासून झालेल्या बदलांचे थेट परिणाम देशाच्या विकासामध्येही अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. आधुनिकीकरण आणि शाश्वत विकास या संकल्पना केंद्रस्थानी ठेवत देशातील वाहतूक व्यवस्थेला नवसंजीनी देण्याच्या या प्रयत्नांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं नाव प्राधान्यानं घेतलं जातं.
नवनवीन संकल्पना असो किंवा मग देशाच्या कानाकोपऱ्यातीह भाग रस्ते मार्गानं जोडणं असो, महामार्गांच्या साथीनं विकास करू पाहणाऱ्या याच गडकरींनी पुढील 2 वर्षांसाठीसुद्धा ध्येय्य निश्चित केलं आहे. सध्या देशात इलेक्ट्रीक वाहनं अर्थात ईव्ही खरेदीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. पण, तरीही पेट्रोल वाहनांच्या तुलनेत ईव्हीची स्वीकारार्हता मात्र काही अंशी कमी आहे.
भारतातच इलेक्ट्रीक दुचाकींच्या यंत्रांची निर्मिती सुरु झाल्यामुळं या वाहनांच्या किमतीत घट झाली असली तरीही चार चाकी वाहनांची किंमत मात्र अद्याप घटलेली नाही. पण, पुढील 2 वर्षांच्या आत हे चित्र बदलणार असल्याचं सूचक वक्तव्य खुद्द नितीन गडकरी यांनी केलं. येत्या दोन वर्षांमध्ये ईलेक्ट्रीक वाहनांच्या किमती पेट्रोलकारप्रमाणं असतील असे संकेत त्यांनी दिले. ACMA च्या 64 व्या वार्षिक सत्रादरम्यान ते बोलत होते. इथं त्यांनी इलेक्ट्रीक वाहनांचे दर आणि सामान्यांची खरेदी करण्याची क्षमता या विषयांना हात घातला.
हेसुद्धा वाचा : घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं ईव्हीवर सब्सिडी दिल्यास आपल्याचा कोणतीही अडचण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 'ईलेक्ट्रीक वाहनांवर देण्यात येणाऱ्या अतिरिक्त सब्सिडी किंवा या संकल्पनेला माझा विरोध नाही. अर्थमंत्री आणि अवजड उद्योग मंत्री हा निर्णय घेणार असतील तर आपल्याला काही अडचण नाही. पण, माझ्या मते उत्पादनांची संख्या वाढत आहे, यामुळे आपण अनुदानाशिवायही खर्च टिकवून ठेवू शकता कारण, उत्पादन खर्च कमी आहे', असंही ते म्हणाले.
ईलेक्ट्रीक वाहनांची उपलब्धता पाहता दोन वर्षांमध्ये त्यांचे दर पेट्रोल डिझेलच्या वाहनांइतके होणार असून, त्यासाठी सब्सिडीची गरज नसून, इथं इंधनाच्या रुपात आधीच बचत होतेय ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. गडकरींचं हे वक्तव्य पाहता देशात येत्या काळात वाहतुकीच मोठे बदल होती हे स्पष्टच दिसत आहे.