नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नितीन गडकरी किंवा माझ्याकडे पंतप्रधानपद सोपवले जाण्याची चर्चा म्हणजे केवळ खयाली पुलाव असल्याची टिप्पणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. ते मंगळवारी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी राजनाथ सिंह यांनी भाजपमधील अंतर्गत वाद, काश्मीरमधील तणाव आणि एअर स्ट्राईक या मुद्द्यांवर सविस्तरपणे भाष्य केले. लोकसभा निवडणुकीनंतर बहुतमासाठी भाजपला संख्याबळाची जुळवाजुळव करावी लागल्यास पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी किंवा तुमच्या नावाचा विचार होऊ शकतो, याबद्दल त्यांना विचारण्यात आले. तेव्हा राजनाथ सिंह यांनी हा दावा सपशेल फेटाळून लावला. त्यांनी म्हटले की, आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला दोन तृतीयांश मतांसह पूर्ण बहुमत मिळेल. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी किंवा माझ्या नावाची चर्चा म्हणजे केवळ खयाली पुलाव आहे. या सर्व गोष्टी कपोलकल्पित आहेत. देशाचे पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील, यामध्ये कोणतीही शंका नसल्याचे राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांची नाराजी आणि भारतीय वायूदलाने केलेल्या एअर स्ट्राईकवरही प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, लालकृष्ण अडवाणी हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. आमच्यासाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत. भारतीय वायूदलाने केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल त्यांना अगोदरच माहिती होती. अडवाणी हे अत्यंत सतर्क आहेत. त्यांना सर्व गोष्टींची माहिती असते, असेही राजनाथ यांनी म्हटले. 




तसेच एअर स्ट्राईकविषयी प्रश्न उपस्थित करण्यावरही आमचा कोणता आक्षेप नाही. केवळ प्रश्न विचारले म्हणून आम्ही कोणालाही देशद्रोही म्हटलेले नाही. प्रत्येकाला प्रश्न विचारायचा हक्क आहे. मात्र, तुम्ही एअर स्ट्राईकचे पुरावे कसे मागू शकता? एअर स्ट्राईकनंतर वायूदलाच्या जवानांनी खाली उतरून मृतदेह मोजायला पाहिजे होते का? ही संपूर्ण मोहीम खात्रीशीर माहितीच्या आधारेच पार पडली होती, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.