Nitin Gadkari About On Election: केंद्रीय रस्ते परिवहन तसेच राज्य महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) सोमवारी निवडणुकांसंदर्भातील सूचक विधान केलं. लोकांची सेवा आणि भलं करण्याच्या राजकारणावरुन मतं दिली जातात केवळ पोस्टरबाजीसाठी मतं दिली जात नाहीत, असं गडकरींनी म्हटलं. इतकच नाही तर गडकरींनी आपण स्वत: असं काही करणार नसल्याचंही स्पष्ट केलं. आगामी निवडणुकींमध्ये मी माझ्या मतदारसंघात पोस्टरही लावणार नाही आणि कोणाला चहापाण्यासाठीही विचारणार नाही. ज्यांना मला मत द्यायचं आहे ते देतील ज्यांना नाही द्यायचं ते नाही देणार, असं गडकरींनी आपल्या भाषणात म्हटलं.


कुठे बोलत होते गडकरी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरींनी कामाच्या आधारावर लोक मतदान करतात हे पटवून सांगण्याचा प्रयत्न आपल्या भाषणात केला. त्यांनी पुढील निवडणुकीमध्ये आपण पोस्टर आणि बॅनर न लावताही विजयी मतांची टक्केवारी वाढवून जिंकून येऊ असा विश्वास व्यक्त केला. सोमवारी राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाचरियावास गावामध्ये एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांचं हे गाव असून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरींनी भाषण दिलं.


मी बॅनर, पोस्टर लावणार नाही


"मी फार कठीण मतदारसंघामधून निवडणूक लढलो होतो. अनेकांनी मला इथून न लढण्याचा सल्ला दिलेला. मात्र मी ही निवडणूक जिद्दीने लढलो. आता मी असं ठरवलं आहे की निवडणुकीमध्ये मी पोस्टर, बॅनर काहीही लावणार नाही. कोणाला चहापाणीही विचारणार नाही आणि काहीच करणार नाही. ज्यांना मतं द्यायची आहेत ते देतील ज्यांना नाही द्यायची ते नाही देणार. मला विश्वास आहे की आधी साडेतीन लाख मतांच्या अंतराने मी जिंकून आलो होतो आणि आता हे अंतर आणखी दीड लाखांनी वाढेल," असं गडकरी म्हणाले. कोणीही पोस्टर्सच्या जीवावर निवडणूक जिंकत नाही असं गडकरींनी म्हटलं.



...तर मतं मिळतात


"लोकांच्या सेवेचं राजकारण केलं तर मतं मिळतात. विकासाचं राजकारण केल्यास मतं मिळतात. गावामधील गरीबांचं कल्याण केलं तर मतं मिळतात. आरोग्य, शिक्षण यासारख्या सेवा देऊन लोकांचं भलं केलं तर मतं मिळतात. तरुणांना रोजगार दिला तर मतं मिळतात. मुलांना शिकण्यासाठी चांगल्या शाळा दिल्या, लोकांना उपचारांसाठी चांगली रुग्णालये उपलब्ध करुन दिली तर मतं मिळतात," असं गडकरी म्हणाले.



मोदींचाही उल्लेख


"भैरवसिंह यांनी जे सेवेचे राजकारण सांगितलं ते केवळ चर्चा करुन होत नाही. केवळ पुस्तकं वाचून हे राजकारण करता येत नाही. केवळ साधनसंपत्ती असल्याने हे राजकारण शक्य होतं नाही. केवळ विचारांच्या आधारावर हे राजकारण शक्य नाही. बोलणं आणि काम करुन दाखवणं यात अंतर नसेल तरच हे शक्य आहे. असं सेवेचं राजकारण हेच भैरवसिंह यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल," असं गडकरी म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत आता परिस्थिती बदलली असून शेतकऱ्यांची स्थिती सुधरली आहे, असं गडकरी म्हणाले.