नवी दिल्ली : भारत पाकिस्तानला जोरदार दणका देण्याची तयारी करत आहे. पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्यात भारत लवकरच यशस्वी होईल. पाणी कसे रोखायेच यावर आधारित प्रकल्पाचे काम सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्याचे काम सुरु आहे आणि त्यात आम्ही यशस्वी होवू, असे सांगून ते म्हणाले, त्यानंतर हे रोखलेले पाणी राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांना मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी मध्य प्रदेशात एका व्हर्चुअल रॅलीला संबोधित करताना सांगितले की, पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी नदी जोड प्रकल्पात भर दिला होता, ज्यावर मोदी सरकार वेगवान गतीने काम करत आहे.  जेव्हा मी जलसंपदामंत्री होतो, तेव्हा १९७० पासून नऊ प्रकल्प रखडले होते. पंजाब, यूपी, हरियाणा इत्यादी राज्ये भांडत होती, त्यामुळे पाकिस्तानला फायदा होत होता. आम्ही नऊपैकी सात प्रकल्प पूर्ण केले. करारादरम्यान तीन नद्या भारत आणि पाकिस्तानला मिळाल्या, परंतु भारतातील नद्यांचे पाणी पाकिस्तानकडे जात होते, ते आता रोखणार आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.


यावेळी गडकरी म्हणालेत, पंतप्रधान मोदींनी मला सांगितले पाण्याचा प्रश्न आधी सोडविला पाहिजे. पाण्याचा हा वाद संपवण्यासाठी मी जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले आणि सात प्रकल्प सुरु केले. याद्वारे आम्ही पाकिस्तानात जाणारे पाणी रोखू शकू. राजस्थान, हरियाणा आणि पंजाबला हे पाणी मिळेल.


गडकरी यांची काँग्रेसवर टीका


कॉंग्रेस ५५-६० वर्षात जे काम करु शकले नाही ते मोदी सरकारने पाच वर्षात केले.१९४७ नंतर देशातील तीन विचारधारेच्या आधारे पक्ष उदयास आले. समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही या विचारधारेचा उदय झाला. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या चिंतनाचा रशियाच्या कम्युनिझम मॉडेलवर परिणाम झाला. त्यांनी रशियन मॉडेल निवडले.  १९४७ नंतरच्या ५५ वर्षांत कॉंग्रेसने अवलंबिलेली धोरणे देशाचा विकास करू शकली नाहीत.आज समाजवादी कुठेही दिसत नाहीत. कम्युनिस्ट म्हणवणाऱ्या चीन आणि रशियाची अवस्था अशी आहे की तिथे फक्त लाल झेंडा दिसतो आणि कम्युनिस्टांना ते दिसत नाही, अशी टीका काँग्रेसवर गडकरी यांनी केली.



'आम्ही आधुनिक विचारधारा निवडली'


 कम्युनिस्ट विचारसरणी सोडून चीननेही भांडवलशाही विचारधारेचा अवलंब करुन विकासाचा पाया घातला. जगात साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाहीचे तीन मॉडेल संपुष्टात आली आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी भारतीय जनसंघ म्हणून सामाजिक-आर्थिक विचार केला. गरिबांचे केंद्रबिंदू म्हणून त्यांच्या प्रगतीची संकल्पना आमच्याकडे होती, आम्ही ती मान्य केली. आम्ही आधुनिक आणि पाश्चात्य विचारधारेमध्ये आधुनिक विचारधारा निवडली, असे गडकरी म्हणालेत.