नितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला
पाटणा : बिहारमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जदयू आणि भाजपला १२२ मतांची गरज होती.
नितीश कुमार यांच्या नव्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये भाजपच्या १४ जणांना त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भाजपच्या पाठिंब्यावर संयुक्त जनता दलाचे (जदयू) नेते नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले आहेत. नितीश कुमार यांच्या सरकारला आजच्या विश्वासदर्शक मतदानात १३१ मते पडली. तर १०८ आमदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर अवघ्या १२ तासांमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले होते.
नितीश कुमार यांनी गुरुवारी सकाळी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज सरकार स्थापन करण्यासाठी नितीश कुमार यांनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती.
बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी राजदकडे ८०, जदयू ७१, काँग्रेस २७ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे तीन जागा आहेत. या सर्व पक्षांची मिळून महाआघाडी तयार झाली होती. मात्र, नितीश यांनी महाआघाडीतून बाहेर पडत भाजपशी हात मिळवणी केली.
दरम्यान, एनडीए युतीने राज्यपालांकडे सादर केलेल्या पत्रात त्यांच्याकडे १३२ आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केला होता. यामध्ये जदयूच्या ७१ , भाजपच्या ५३, आरएलएसपीच्या २ , एलजेपीच्या २ आणि एचएएमच्या एका आणि तीन अपक्ष आमदारांचा समावेश होता.