फरार मौलाना सादला सुचली उपरती, दिला हा संदेश
निझामुद्दीन मरकज प्रकरणात फरार असलेल्या मौलानाचा एक नवा ऑडीओ समोर आलाय.
नवी दिल्ली : निझामुद्दीन मरकज प्रकरणात फरार असलेल्या मौलानाचा एक नवा ऑडीओ समोर आलाय. या ऑडीओतून तो रमझानमध्ये लोकांना लॉकडाऊन न तोडण्याचे आवाहन करतोय. लोकांनी घरीच नमाज पठण करा तसेच वाईट काम करु नका असे आवाहन देखील त्याने केले आहे.
तबलिगी समाजाचा प्रमुख मौलाना सादने आपल्या समाजाला पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ऑडीओच्या माध्यमातून त्याने हा संवाद साधला आहे. या आजाराचा इलाज आहे. तुम्ही तपास करुन घ्या. वाईट काम करु नका आणि वाईट काम करणाऱ्यांना रोखा.
तुमचा विश्वास असणे गरजेचं आहे. विश्वास ठेवलात तर सर्व अडचणींमधून बाहेर पडाल असे तो म्हणाला.
तबलिगी समाजाचा कार्यक्रम घडवून आणणाऱ्या मौलाना साद आणि त्याच्या साथीदारांवर जाणिवपूर्वक हत्येच्या तक्रारी आहेत. विदेशातून आलेला तबलिगी समाज ज्यांनी विसा नियमांचे उल्लंघन केले, त्यांच्याविरोधात देखील लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ११०० वर गेली असून यामध्ये १७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. यामधील ५५ टक्के रुग्ण हे निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेले आहेत. प्रत्येक दिवशी इथे नवे रुग्ण सापडत आहेत.
मौलाना साद फरार
मौलाना साद याचा पोलीस शोध घेत असले तरी तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी घरी नोटीस दिल्यानंतर मौलाना साद यानं त्याच्या अनुयायांमार्फत निरोप पाठवून सांगितलं की, त्यानं स्वतःला सेल्फ क्वारंटाईन केलं आहे आणि जेव्हा मरकज सुरु होईल तेव्हा तो पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देईल.