नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिवाळीच्या काळात फटाके वाजवण्याला सशर्त मंजुरी दिली. मात्र, फटाक्यांची ऑनलाईन विक्री करण्यास न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला. याशिवाय, फटाके वाजवण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ निर्धारित करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर, नाताळ आणि नवीन वर्षाला रात्री ११.४५ ते मध्यरात्री १२.३० पर्यंत फटाके फोडता येतील. मोठे फटाके आणि फटाक्यांच्या माळांवरही सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. तसेच विशिष्ट सुरक्षित ठिकाणीच आणि ठरवून दिलेल्या वेळेतच फटाके उडवावेत असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
 
न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या खंडपीठाने कारखानदारांना कमी प्रदूषण करणारे फटाके तयार करण्याचे आदेश दिले. तसेच फटाक्यांची विक्री परवानाधारक विक्रेत्यांकडूनच होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. फटाके विक्रीबाबत अंशतः घातलेली बंदी ही देशभरात लागू असून पर्यावरण रक्षणासाठी या आदेशांचे नागरिकांनी पालन करावे असे न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भुषण यांनी निर्णय देताना म्हटले.


दिवाळीत होणारे वायू व ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी देशभरात फटाक्यावर बंदी घालावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. फटाक्यांसाठी नियमावली तयार करणे चांगले पाऊल आहे. मात्र, अॅल्युमिनिअम आणि बेरिअमच्या वापरावर निर्बंध घालणे योग्य नसल्याचा युक्तिवाद केंद्र सरकारकडून न्यायालयात करण्यात आला होता.