बालिश राजकारण थांबवा, नरेंद्र मोदींनी काँग्रेसला खडसावले
मोदी हटावचा अहंकार आणि खोट्या आत्मविश्वासाच्या जोरावर हा अविश्वास प्रस्ताव रेटण्यात आला.
नवी दिल्ली: पंतप्रधान होण्याची घाई असलेल्यांनी आज संसदेत अविश्वास ठराव मांडला. मात्र, लोकशाहीत अशाप्रकारे सत्ता मिळवायची नसते. त्यासाठी जनतेच्या निकालावर विश्वास ठेवायचा असतो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास ठराव मांडणाऱ्या विरोधकांना सणसणीत प्रत्युत्तर दिले.
देशातील काहीजणांना सध्या नकारत्मक राजकारणाने घेरले आहे, हे आज अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने दिसून आले. विरोधी पक्षांकडे कोणतेही बहुमत नसताना अविश्वास ठराव मांडण्यातच का आला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांना मी असे सांगू इच्छितो की, मोदी हटावचा अहंकार आणि खोट्या आत्मविश्वासाच्या जोरावर हा अविश्वास प्रस्ताव रेटण्यात आला. यावेळी मोदींनी केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये केलेल्या कामांचा पाढा वाचला. तसेच विकास दर्शविणाऱ्या अनेक संस्थांच्या आकडेवारीचा दाखलाही दिला. मात्र, स्वार्थी राजकारणासाठी विरोधक या संस्था, न्यायपालिका अशा सर्वच यंत्रणांच्या विश्वासर्हतेवर शंका उपस्थित करत असल्याची टीका मोदींनी केली.
डोकलाम आणि राफेलसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर आणखी किती काळ तुम्ही बालिशपणा दाखवणार आहात, असा सवाल विचारत मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य केले. राफेल विमान खरेदीचा मुद्दा देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, तुमच्या बालिश विधानांमुळे दोन्ही देशांना स्पष्टीकरण देण्याची वेळ येते. देशातील जनता हे सर्वकाही बघत आहे, असे मोदींनी सांगितले.