मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसनं टाकलेल्या नव्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे. गुजरातमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कोणाला पाठिंबा देणार हे निश्चित नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेल्या या भूमिकमुळे काँग्रेसचे दिग्गज अहमद पटेल यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला पाठिंबा देणार आहे, असा दावा खुद्द अहमद पटेल यांनी केला आहे. पण अहमद पटेल यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीकडून मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


गुजरातमधली राज्यसभेची ही निवडणुकीची देशामध्ये चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सोनिया गांधींचे सल्लागार अहमद पटेल यांना हरवण्यासाठी भाजपनं जोरदार रणनिती आखली आहे. अहमद पटेल यांना हरवून काँग्रेसला सगळ्यात मोठा धक्का देऊन नामोहरम करण्याच्या प्रयत्नामध्ये भाजप आहे.


या निवडणुकीमध्ये आमदार फुटू नयेत म्हणून काँग्रेसनं त्यांच्या ४२ आमदारांना बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. काहीच दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला होता. त्याआधी विधानसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद असलेले बलवंतसिंह राजपूत, तेजश्रीबेन पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी पक्ष सोडून थेट भाजपामध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे गुजरातमधून काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभा निवडणूक लढवणारे अहमद पटेल आणि काँग्रेस पक्षाच्या अडचणीत वाढ झालीय.