नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होतं आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज एनडीएची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीला शिवसेनेला निमंत्रण पाठवण्यात आलेलं नसल्याचं समजतंय. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं आता एनडीएशी शिवसेनेनं काडीमोड घेतल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळंच शिवसेनेला भाजपनं बोलावलेलं नसावं, अशी शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावरून शिवसेनेचे खासदार आता या अधिवेशनापासून संसदेत विरोधी बाकांवर बसलेले दिसतील असं सांगण्यात येत आहे.


मुख्यमंत्रीपद आणि सत्तेचं समान वाटप यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी एकमत झालं नाही. अखेर शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याचा निरोप राज्यपालांकडून मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आवाहन केलं आहे.


काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सत्ता कशी स्थापन करता येईल. यावर तीनही पक्षात बोलणी सुरू आहे. यामुळे राज्यात भाजप एकटी पडल्याचं दिसून येत आहे. 


राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना मदत पोहोचवणे गरजेचे असल्याने लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्याची गरज असल्याचं सर्वच राजकीय पक्षांकडून बोललं जात आहे.