Amit Shah On CAA implementation: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात (सीएए) आपली भूमिका स्पष्ट करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिलं आहे. देशामध्ये सीएए लागू करण्यापासून केंद्र सरकारला कोणीही रोखू शकत नाही, असं शहा यांनी बुधवारी पश्चिम बंगालमधील सभेतील भाषणामध्ये म्हटलं. ममता बॅनर्जींचा सीएएला विरोध असताना त्यांच्या गृहराज्यात येऊन शहा यांनी हे विधान केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहा यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. पश्चिम बंगाल सरकार लांगूलचालनाचे राजकारण करत असून पुढील विधानसभा निवणुकीमध्ये भाजपाच्या बाजूने कौल देण्याचं आव्हान त्यांनी सभेत केलं.


ममता बॅनर्जींवर हल्लाबोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘नागरिकत्व कायदा हा देशाचा कायदा आहे. केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये सीएएची अंमलबजावणी करेल. आम्हाला सीएएची अंमलबजावणी करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही,’ असं शहा म्हणाले. पश्चिम बंगालमधील परिस्थितीसंदर्भातही शहा यांनी भाष्य करताना राज्य सरकारवर राजकीय हिंसाचार, भ्रष्टाचार आणि लांगूलचालनाच्या राजकारणाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला. 'ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालला उद्धवस्त केलं आहे. 'सोनार बांगला' तसेच 'मा माटी मानूष' ची घोषणा देत दीदींनी कम्युनिस्टांना सत्तेतून बाहेर फेकले. मात्र सत्तांतर झाल्यानंतरही राज्यामध्ये बदल झाला नाही. घुसखोरी, लांगूलचालनाचे राजकारण, भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार राज्यभरात दिसून येत आहे. डाव्यांनी राज्यावर 27 वर्ष राज्य केलं. ममता बॅनर्जींना सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाल्यानंतरही त्यांनी राज्याची दयनीय परिस्थिती करुन ठेवली आहे,' असं शहा म्हणाले. तसेच शहा यांनी, 'घुसखोरांना उघडपणे व्होटींग कार्ड दिली जात आहेत. तसेच घुसखोरांना आधार कार्डची वाटप केली जात आहे. हे सारं डोळ्यासमोर होत असताना मुख्यमंत्री मात्र शांत आहेत,' असं म्हणत ममतांवर निशाणा साधला.


इथं सर्वाधिक हिंसाचार होतो


'राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांच्या हत्या झाल्या. राज्यातील जनता आता या हत्येचा बदला घेईल. बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात सर्वाधिक हिंसाचार होतो. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्याही हत्या झाल्यात. आता 2026 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता या सगळ्याचा बदला घेईल,’’ असे शहा यांनी सांगितले.


मोदींनी दहशतवादाचे उच्चाटन केले


केंद्रातील भाजप सरकार राज्यासाठी बराच निधी पाठवते पण तृणमूलची सिंडिकेटमुळे हा निधी तुमच्यापर्यंत पोचत नाही. पंतप्रधान मोदींनी अवघ्या देशातून दहशतवादाचे उच्चाटन केले आहे. जम्मू- काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम हटविण्याचे काम त्यांनीच केलं आहे. देशातून डावा कट्टरतावाद संपुष्टात आला असल्याचे शहा यांनी म्हटलं.