नवी दिल्ली: संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAB)मंजूर झाल्यानंतर ईशान्येकडील राज्यांमध्ये निर्माण झालेला जनक्षोभ शांत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर पाऊल उचलले आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी आसाममधील जनतेला उद्देशून एक ट्विट केले. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी तुमचे हक्क कोणीही हिरावून घेणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी आसाममधील बंधू आणि भगिनींना सांगू इच्छितो की, नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. स्वतंत्र ओळख आणि संस्कृतीचा तुमचा अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही, याची हमी मी तुम्हाला देतो. तुमच्या संस्कृतीची अशीच भरभराट होत राहील, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच केंद्र सरकार हे आसामच्या राजकीय, भाषिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक हक्काच्या रक्षणासाठी संविधानिकदृष्ट्या कटिबद्ध आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. 


भाजपने दडपशाहीने CAB मंजूर करवून घेतले- संजय राऊत



नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसामसह ईशान्य भारतात हिंसक आंदोलने सुरु आहेत. विद्यार्थी संघटना आणि पोलीस यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण आसामचे रुपांतर 'कॅब'विरोधी युद्धभूमीत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आसाममध्ये संचारबंदी लागू झाली असून इंटरनेटसेवाही खंडित करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराच्या तुकड्या तैनात आहेत. तणावपूर्ण परिस्थितीमुळं आसाममधील विमानसेवा बंद करण्यात आली आहे.



नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत १२५ विरुद्ध १०५ मतांनी मंजूर झाले. १९५५ मधील नागरिकत्व विधेयकात दुरुस्ती करण्यात आल्याने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या विविध सहा धर्मीय निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला होता.