नो वन किल्ड आरुषी...
देशभरात गाजलेल्या आरूषी आणि हेमराज हत्याकांडातून आरूषीच्या आईवडलांना अलाहाबाद हायकोर्टानं दोषमुक्त केलंय.
अलाहाबाद : देशभरात गाजलेल्या आरूषी आणि हेमराज हत्याकांडातून आरूषीच्या आईवडलांना अलाहाबाद हायकोर्टानं दोषमुक्त केलंय.
नोएडाध्ये घडलेली ही थरारक घटना... प्रसिद्ध डॉक्टर राजेश तलवार आणि डॉ. नुपूर तलवार यांची १४ वर्षांची कन्या आरूषी आणि त्यांच्या घरातला नोकर हेमराज यांचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आले होते... ही हत्या सर्जिकल शस्त्रानं झाल्याचं निष्पन्न होताच मुख्य संशयीत म्हणून आरूषीचे वडील डॉक्टर रमेश तलवार यांनाच पोलिसांनी अटक केली. त्यामुळं देशभरात मोठी खळबळ माजली.
मात्र तलवारांच्या दुसऱ्या नोकरालाही संशयित म्हणून जेलबंद केल्यानंतर पुन्हा या खटल्याची दिशा बदलली. मात्र, सीबीआयकडे खटला वर्ग केल्यानंतर संशयाची सुई तलवार दाम्पत्याकडेच जात होती. त्यामुळं सीबीआय कोर्टानं नोकराला क्लीन चीट देत तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा दिली होती. मात्र, या निर्णयाला आव्हान तलवार कुटुबियांनी अलाहाबाद हायकोर्टात आव्हान दिलं. अखेर, सीबीआयनं सादर केलेल्या पुराव्यांमध्ये कमतरता असल्यानं संशयाचा फायदा देत हायकोर्टानं दोघांची निर्दोष मुक्तता केली.
गेली दहा वर्षे हा खटला देशभरात गाजत राहिला... अनेक नाट्यमय घडामोडी या खटल्यात घडल्या...
- १६ मे २००८ ला आरूषी आणि तलवार कुटुंबियांचा नोकर हेमराजची हत्या झाली
- २३ मे २००८ ला आरूषीच्या आई-वडिलांना दुहेरी हत्याकांडात अटक करण्यात आली
- त्यानंतर १ जून २००८ - तपास नोयडा पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला
- १३ जून २००८ ला तलवार यांच्या दुसऱ्या नोकराला अटक केली.
- मात्र, अचानक १२ जुलै २००८ - राजेश तलवार यांना जामीन मिळाला आणि तपासाला वेगळी दिशा मिळाली.
- अनपेक्षितपणे २९ डिसेंबर २००९ ला पुराव्या अभावी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला.
- मात्र ९ फेब्रुवारी २०११ ला सीबीआय कोर्टानं क्लोजर रिपोर्ट धुडकावत तलवार दाम्पत्यावर हत्येचे आरोप ठेवत दुहेरी हत्याकांडात तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मात्र, या निकालामुळे एका नव्या प्रश्नाला जन्म दिला... राजेश आणि नुपूर तलवार निर्दोष आहेत तर मग आरुषी-हेमराजचा गळा कुणी चिरला? सीबीआयच्या तपासात त्रुटी असल्याचं हायकोर्टात अधोरेखित झालंय. आता पुन्हा या प्रकरणाचा नव्यानं तपास करून सीबीआय सुप्रीम कोर्टाला सामोरं जाणार का? या हत्याकांडावर 'तलवार' नावाचा सिनेमा पडद्यावर झळकला आहेच... आता एखाद्या निर्मात्यानं 'नो वन किल्ड आरुषी' असा सिनेमाही निघाला, तर आश्चर्य वाटायला नको...