Privatisation of Railway : रेल्वेच्या खाजगीकरणावर मंत्री पियुष गोयल यांनी केली मोठी घोषणा
भारतीय रेल्वेचं खाजगीकरण होईल, अशा चर्चा सुरू असतानाच त्याला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पूर्णविराम दिला आहे. भारतीय रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही, असं ठामपणे गोयल यांनी लोकसभेत सांगितलं आहे. रेल्वे ही कायमच सरकारकडे राहील, असं आश्वासन पियुश गोयल यांनी दिलं आहे.
मुंबई : भारतीय रेल्वेचं खाजगीकरण होईल, अशा चर्चा सुरू असतानाच त्याला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पूर्णविराम दिला आहे. भारतीय रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही, असं ठामपणे गोयल यांनी लोकसभेत सांगितलं आहे. रेल्वे ही कायमच सरकारकडे राहील, असं आश्वासन पियुश गोयल यांनी दिलं आहे.
लोकसभेत आज हा मुद्दा तापलेला असताना रेल्वेमंत्री म्हणाले, की रस्ते हे पण सरकारचेच असतात, मात्र तरीही त्यावरून खाजगी वाहनं जातात. तेव्हा कोणी म्हणतं का, की सरकारी रस्ता आहे तर इथून सरकारी वाहनेच जाणार?
त्यामुळे जेव्हा रेल्वेमध्ये खाजगी गुंतवणुकीचा विषय येतो, तेव्हा त्याचं स्वागत झालं पाहिजे, त्यामुळे जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देणं शक्य होणार आहे, असं पियुष गोयल म्हणाले. खाजगी रेल्वे गाड्या चालवल्या जाणार असल्या तरी रेल्वेशी निगडीत यंत्रणा ही सरकारच्याच मालकीची राहील, असं रेल्वेमंत्र्यांनी आश्वस्त केलं.
पुढे गोयल यांनी सांगितलं, भारतीय रेल्वेला भविष्याच्या दृष्टीने चालवण्यासाठी राष्ट्रीय रेल योजना २०३० तयार करण्यात आली आहे.
याशिवाय लोकसभेत बोलताना गोयल यांनी लॉकडाऊनदरम्यान सुरू असलेल्या रेल्वेसेवेबाबतही माहिती दिली. कोरोना काळात गरजूंना रेल्वेमार्फत कशी मदत करण्यात आली, किती अन्न पुरवण्यात आलं, याचाही लेखाजोखा त्यांनी लोकसभेत मांडला.