पाकसोबत तडजोडीचा प्रश्नच नाही; वैमानिकाच्या सुटकेची भारताची मागणी
अभिनंदनची कुठल्याही अटींशिवाय तात्काळ सुटका करण्यासही भारतानं पाकिस्तानला बजावलंय
नवी दिल्ली : भारतीय वैमानिकाची सुटका करुन तणाव निवळणार असेल, तर त्याला सोडायला तयार अशी भूमिका गुरुवारी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केली. परंतु, भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात आहे. याचाच फायदा घेत पाकिस्ताननं भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, आधी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा, मगच बोलू अशी भूमिका भारतानं घेतलीय. सोबतच अभिनंदनची कुठल्याही अटींशिवाय तात्काळ सुटका करण्यासही भारतानं पाकिस्तानला बजावलंय.
भारतीय वैमानिक अभिनंदन यांना परत करणं म्हणजे तणाव निवळत असं असेल तर आम्ही त्याला सोडायला तयार आहोत, असं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटलंय. विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ अशी माहितीही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलीय. त्यामुळे आता विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेच्या शक्यता बळावल्या आहेत.
मात्र पाकिस्तान याआडून कंदाहार प्रमाणे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा कोणत्याही दबावाला भारत बळी पडणार नाही, पाकिस्तानने तातडीने वैमानिक अभिनंदनला भारतात परत पाठवावं अशी भूमिका भारताने घेतल्याची माहिती आहे. आधी दहशतवाद्यांवर कारवाई करा, मगच बातचीत करू, अशीच भारताची पाकिस्तानसंदर्भात भूमिका राहणार आहे. कुठलीही बोलणी करण्याआधी पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात तातडीनं, कठोर आणि विश्वासार्ह कारवाई करावी, अशी भूमिका भारतानं घेतलीय. इम्रान खान दहशतवादविरोधी कारवाईच्या ज्या वल्गना करतात, जे बोलतात, ते त्यांनी प्रत्यक्ष करुन दाखवावं, असं भारतानं म्हटलंय. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांनी ही माहिती दिलीय.
इतकंच नाही तर, पाकिस्ताननं अभिनंदन यांना सहीसलामत भारताकडे सोपवावं, त्यांना काही झालं तर भारताला मोठी कारवाई करावी लागेल, अशी तंबीही भारतानं पाकिस्तानला दिल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई आणि पठाणकोट हल्ल्याचे पुरावे आणि माहिती देऊनही दहशतवाद्यांवर पाकिस्तानकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हेच दहशतवादी पुन्हा एकदा अशाच मोठ्या हल्ल्याचा कट रचत होते. भारतानं केलेलं ऑपरेशन दहशतवादाविरुद्ध होतं. यात पाकिस्तान सेना किंवा कोणत्याही सामान्य नागरिकाला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहचलं नाही. त्यामुळे भारत नाही तर पाकिस्तान तणावात भर घालत आहे, असं भारतानं पाकिस्तानला ठणकावल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात येतंय.
दरम्यान, भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख दिल्लीत आज संध्याकाळी पाच वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी, ते भारत पाकिस्तान दरम्यान तणावासंदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.